मुंबई: राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन जिल्ह्यांबाबतच्या निर्णयाला अवघ्या 24 तासांमध्ये स्थगिती देण्यात आली. यामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. रायगडच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, महायुतीमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंच्या गोटात सावध भूमिका घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाव्होस आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले आहेत. ते नसताना अचानक सूत्रं फिरली अन् रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या संयमाची भूमिका घेण्यात आल्याचे चित्र आहे. पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच अधिकार आहे.
महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच पालकमंत्री पदावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. सध्या मुख्यमंत्री परदेशात असल्यामुळे ते आल्यानंतरच यावर तोडगा निघणार असल्याने सध्या या विषयावर कोणतीच प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले जाते.
शिंदे गटाला रायगडच्या पालकमंत्री भरत गोगावले यांची वर्णी लावायची होती. भरत गोगावले बराच काळापासून त्यासाठी मोर्चेबांधणी करत होते. तर नाशिकमध्ये दादा भुसे, माणिकराव कोकाटे असे बडे नेते असतानाही गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याने महायुतीमधील खदखद प्रचंड वाढली आहे. यावर आता काय तोडगा निघणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी भाजपचे बडे नेते दरे गावाला जाणार
पालकमंत्र्यांची यादी समोर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कोणाशीही एक शब्द न बोलता साताऱ्यातील आपल्या दरे या मूळगावी जाऊन बसले आहेत. परिणामी महायुतीत प्रचंड खदखद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे विशेष विमानाने दरे गावाला जाणार आहेत. याठिकाणी जाऊन हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांची समजूत काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे त्याला सकारात्मक प्रतिसाद देणार का आणि ते नेमकं काय पदरात पाडून घेणार, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा