रायगड : देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्षे झाली असून जगभरातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने भारत पाऊलं टाक आहे. एकीकडे डिजिटल इंडियाचा जोर धरत असताना दुसरीकडे आजही गावखेड्यात, वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना अनेक यातना सोसाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे रायगड (Raigad) जिल्ह्यात मृत्यूनंतरही मरणयातना सोसाव्या लागत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. दाभोळवाडी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना स्मशानभूमीत पत्रेच नसल्याने चक्क पावसात अंत्यसंस्कार (Funeral) करावे लागत आहेत. त्यामुळे, प्रशासनाचा आंधळेपणा आणि आपटा ग्रामपंचायतचा विचित्र कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील दाभोळवाडी येथील महिला गिरजी गणा वाघे यांचे नुकताच निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीला पत्रे नसल्याने भर पावसात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. या घटनेमुळे आपटा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील स्मशानभूमीला पत्रेच नसल्यामुळे पावसात मृतदेहावर पत्रे वरती धरून अंत्यसंस्कार करावे लागले. या घटनेमुळे आदिवासी समाजाने  आपटा ग्रामपंचायत आणि प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त  केला आहेत.  

आपटा ग्रामपंचायत हद्दीत प्रामुख्याने आदिवासी समाज मोठ्या मोठ्या संख्येने राहतो. मात्र या वाड्याकडे आपटा ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड यांनी केला आहे. तर आपटा गंगेची वाडी येथील स्मशानभूमीचीही हीच अवस्था असल्याने त्यांनाही मोठ्या हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत. एकीकडे विकासाच्या बाता, पण दुसरीकडे आपटा ग्रामपंचायतचा विचित्र कारभार चव्हाट्यावर आल्याने आदिवासी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. कोरल वाडी येथे स्मशानभूमीच नाही, येथे लोकवस्ती 120+ आहे. संपूर्ण गावात 14 आदिवासी वाड्या आहेत. त्यामध्ये, धनगर , कातकरी , ठाकूर समाज वास्तव्यास आहे. मात्र, स्मशानभूमि नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मरणयातनाही संपत नसल्याचं दिसून येत आहे. 

पैशाचा पाऊस पाडण्यासाठी स्मशानभूमीत अघोरी प्रकार

दरम्यान, रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील स्मशानभूमीत जादूटोणाचा प्रयत्न करताना काही इसमांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. पैशाचा पाऊस पडावा यासाठी ही अघोरी विद्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे आदिवासी वाडीतल्या स्मशानात काही अनोळखी इसम रात्री  संशयास्पद हालचाली करत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं, त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन इसमांना पकडून चांगलाच चोप दिला, तर चौघे तिथून पसार झाले. पकडलेल्यांमध्ये एक शिंदे नावाचा स्थानिक असून दुसरा सुधागड तालुक्यातील असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे समाजात आजही अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे, हे अधोरेखित झालं आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, स्थानिकांनी अशा प्रथांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती; केंद्राकडून मिळाला IAS दर्जा