Raigad Accident Ambenali Ghat:रायगडच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात (Accident news) घडल्याची घटना समोर आली आहे. या घाटात एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गातील आंबेनळी घाटाच्या (Ambenali Ghat) परिसरात ही दुर्घटना घडली. स्कॉर्पिओ गाडी (Scorpio Car) खोल दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरु झाले. बचाव पथकांना आतापर्यंत दोन मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटात जवळपास 1000 फूट खोल दरीत कोसळली आहे. ही स्कॉर्पिओ गाडी साताऱ्यातील असल्याचे समजते. (Raigad Accident News)
रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात अनेकदा अपघात घडतात. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक प्रशासन, ट्रेकर्स आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, खोल दरी आणि कठीण भूप्रदेशामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. सध्या दोरीला स्ट्रेचर बांधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात गेली आहे. अपघातामधील मृत प्रवासी हे कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते आहे.
प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Raigad Accident news: रायगडमधील 2018 सालच्या बस दुर्घटनेची आठवण
आंबेनळी घाटात घडलेल्या या अपघातामुळे 2018 साली घडलेल्या बस अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. 2018 साली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसचा आंबेनळी घाटातच अपघात झाला होता. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. काल रात्री स्कॉर्पिओ कारचा अपघातही साधारण याच भागात झाला.
आणखी वाचा
