रायगड : महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांच्या मुलासह इतर आरोपींना अटक करण्यात सरकारला आलेल्या अपयशावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना याप्रकरणी काहीही करता येत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. मुख्यमंत्री आणि भरत गोगावलेंकडून निर्देश घ्या, अशा सूचना कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत. 

भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. 

सरकारला अटक करायची नसेल...

महाड प्रकरणी मंत्र्याच्या मुलासह इतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. सरकार कोणालाही 24 तासात अटक करू शकते. पण जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते अशी प्रतिज्ञापत्रं सादर करतात असा शब्दात उच्च न्यायालयाने फटकारलं.

महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झालं आहे. माननीय मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

यावेळी आपला मुलगा फरार नसून आपल्या संपर्कात असल्याचं भरत गोगवलेंच वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर येताच अद्याप गोगावलेंचा जबाब का घेण्यात आला नाही असा सवाल राज्य सरकारला करण्यात आला. मुलगा बेपत्ता असल्याबद्दल त्यांचा देखील जबाब नोंदवा हे सांगायला देखील न्यायालय विसरलं नाही. 

गुन्हे करून मंत्र्यांची मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात असतात पण पोलिसांना सापडत नाहीत? आणि तरीही मंत्री मात्र खुशाल मंत्रिमंडळात बसतात? राज्यात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा सवाल उपस्थित करत भरत गोगावले 26 जानेवारीला ध्वजारोहण करणार असल्याच देखील न्यायालयाने यावेळी निदर्शनास आणून दिल.

Mahad Rada Vikas Gogawale : नेमकं प्रकरण काय?

महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव उसळला होता. विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 

ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. मात्र आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर हे सगळे आरोपी फरार आहेत. तेव्हापासून विकास गोगावले यांना अटक करण्यास पोलिसांना अपयश आलं आहे.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्रीपदावरुन भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरु आहेत. याच वादातून दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. गेल्या काही काळामध्ये तटकरे आणि गोगावले या दोघांनीही एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडले आहेत. त्यामुळे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वैर आणखीनच वाढले आहे. याचा उद्रेक मतदानावेळी पाहायला मिळाला.