Mumbai Goa Highway Update : कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) रुंदीकरणाबाबत एक अत्यंत निराशाजनक चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग पूर्ण करण्यासाठी दिलेली 31 मे ची डेडलाईन पूर्णपणे अपयशी ठरली आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्ण होईल, असं आश्वासन गडकरी यांनी दिलं होते. मात्र, प्रत्यक्षात जून महिना सुरू झाला तरी महामार्गाचं काम अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलं आहे.
महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावर टोल वसुली सुरू केल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नितीन गडकरी यांनी माजी खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात ही डेडलाईन दिली होती. मात्र, ही डेडलाईन हुकल्यामुळे कोकणकरांना यंदाचा पावसाळा देखील याच खडतर आणि खड्डेमय महामार्गावरून प्रवास करत घालवावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Mumbai Goa Highway Kharpada Toll काम अपूर्ण, टोल मात्र सुरू
या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तब्बल 2011 म्हणजेच मागील 15 वर्षांपासून सुरू आहे. या दीर्घ काळात अनेक नामांकित कंपन्यांनी या महामार्गावरील कामात आपली यंत्रणा लावली, कंत्राटदार बदलले, मात्र अजूनही हा महामार्ग पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. महामार्ग पूर्ण होण्याआधीच खारपाडा येथे पहिला टोल सुरू करून प्रवाशांची लूट सुरू करण्यात आली आहे. या टोल वसुलीला कोकणकरांनी कडाडून विरोध केला होता, मात्र प्रशासनाने नागरिकांचा विरोध डावलून खारपाडा टोल सुरूच ठेवला आहे.
Mangaon Indapur Bypass : रायगड जिल्ह्यातील 'या' भागांत कामे रखडली
महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील वाहतुकीला बसत आहे. या भागातील अपूर्ण कामांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:
बायपासचे काम अपूर्ण : रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माणगाव आणि इंदापूर या दोन्ही बायपासचे (Bypass) काम अजूनही पूर्ण झालेले नाही.
उड्डाणपूल आणि सर्व्हिस रस्ते : कोलाड जवळील उड्डाणपुलाचे काम रखडलेलं आहे. याशिवाय उड्डाणपुलांखालील गावांना जोडणारे सर्व्हिस रस्ते आणि अनेक भागांतील अंतर्गत रस्ते अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत.
10 किमीचे काम प्रलंबित : माणगाव आणि इंदापूर या दोन्ही बायपास मिळून साधारण 10 किलोमीटर अंतराचे मुख्य काम अद्यापही बाकी आहे.
Mumbai Goa Highway Current Status : रायगड जिल्ह्यात नेमकी काय आहे परिस्थिती?
रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाचे एकूण 140 किलोमीटरचे जाळे पसरलेले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सद्यस्थितीत रायगड भागात केवळ 70 टक्के काम पूर्ण झाले असून 30 टक्के काम अजूनही प्रलंबित आहे. अनेक भागांत एकेरी वाहतूक सुरू असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
महामार्गावर उड्डाणपूल, सर्व्हिस रस्ते आणि महत्त्वाचे बायपास अपूर्ण असताना मंत्री महोदयांनी कोणत्या आधारावर 31 मे ची डेडलाईन दिली होती? असा संतप्त सवाल आता कोकणचे प्रवासी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केवळ आश्वासनांची खैरात केली जाते, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती बदलत नाही, अशी भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. जून महिना सुरू झाल्याने आता पावसाळा तोंडावर आला आहे. अशा स्थितीत अर्धवट रस्ते आणि सर्व्हिस रस्त्यांमुळे यंदाचा पावसाळा कोकणवासीयांसह सर्व प्रवाशांसाठी सुखकर ठरणार की अधिक त्रासदायक, याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे.
ही बातमी वाचा:
