Raigad Guardian Minister: राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं, मंत्रीपद वाटप देखील झालं, मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा (Raigad Guardian Minister) तिढा अद्याप काही सुटला नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) हे पालकमंत्री पदावर ठाम आहेत. तसेच मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना देखील जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. अशातच रायगड पालकमंत्री पदासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी रायगड जिल्ह्यातील आमदार भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale) आणि महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाचा प्रश्न रखडलेला आहे. अशातच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सुद्धा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रायगड पालकमंत्री पदासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी भरतशेठ गोगावले आणि महेंद्र दळवी हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, याच मुद्याला घेऊन आज मुख्यमंत्री सभागृहात गेले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आल्यानंतरच भरतशेठ गोगावले म्हणाले की 'आम्हाला वेळ हवा आहे' यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी आपण थोड्यावेळाने भेटू असं उत्तर दिलंय. त्यामुळे या भेटी नंतरतरी रायगडच्या पालकमंत्रीपदावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सुनील तटकरेंचा महाडनंतर आता कर्जतकडे मोर्चा
यंदाची विधानसभा लढवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र महायुतीकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने नाराज झालेल्या सुधाकर घारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह 22 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभेचे तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादीच्या कर्जत मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामे दिले होते. यानंतर नाराज झालेले घारे यांनी अपक्ष राहून कर्जत खालापूर ची विधानसभा लढवली होती. आणि या लढाईत ते अवघ्या पाच हजार मतांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा समोर पराभूत झाले होते.त्यानंतर ते आजपर्यंत राष्ट्रवादीपासून वेगळेच राहिले होते.
त्यानंतर आता राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र काढला आहे यामध्ये सुधाकर घारे आणि त्यांच्या कर्जत खालापूर मतदार संघातील पदाधिकारी यांचे राजीनामे नामंजूर केल्याचे पत्र काढले आहे.यामुळे सुनील तटकरे यांनी महाड मध्ये गोगावले यांना शह देण्यासाठी स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी मध्ये घेण्याचा घाट आखला असून. कर्जत मध्ये सातत्याने त्यांच्यावर बोचरी टीका करणाऱ्या महेंद्र थोरवे यांना पुन्हा शह देण्यासाठी सुधाकर घारे यांची घरवापसी करून घेत असल्याच बोलल जात आहे. त्यामुळे तटकरे यांनी महाड नंतर आता आपला मोर्चा कर्जत कडे वळविल्याचा दिसून येत आहे.
राष्ट्रवादीत अजूनही पालकमंत्री पदासाठी आग्रही?
दरम्यान, राष्ट्रवादीत अजूनही पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे का? असा प्रश्न आमदार महेंद्र दळवी यांना केला असता त्यावर ते म्हणाले की, प्रोटोकॉलनुसार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री पद मागणे हे ठीक नाही. शेवटी रायगडच्या जनतेनी भरत गोगावले यांच्या रूपाने न्याय दिला आहे. सुनील तटकरे कधीच मोठ मन करत नाहीत, असे म्हणत दळवी यांनी थेट सुनील तटकरेंवर घणाघात केला आहे. सुनील तटकरे हे स्वार्थापोटी निर्णय घेतात. आता असं अजिबात चालणार नाही, असेही महेंद्र दळवी म्हणाले. रायगडची जनता आता हा निर्णय अजिबात स्विकारणार नाही. रायगडची जनता आता फक्त भरत गोगावले यांनाच स्वीकारतील असेही ते म्हणाले.
हे ही वाचा