पुणे : बुधवारी मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीने पुण्यात धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले. कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात प्रथम ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने  (Pune Crime News) वार करून हल्ला करण्यात आला. एका रात्री दोन रक्तरंजित कृत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड, गणेश राऊत यांच्यासह आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. सर्व पाचांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत, आरोपींनी “आम्हीच इथले भाई” असा दहशतीचा आव आणत हे हल्ले केल्याचे समोर आले. केवळ गाडीला साईड न दिल्याच्या कारणावरून धुमाळ यांच्यावर गोळीबार झाला, तर सागर साठे यांच्यावर कोणतेही कारण नसताना फक्त दहशत पसरवण्यासाठी कोयत्याने वार करण्यात आला.मागील काही दिवसांपासून शांत असलेली घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे. या घटनेत निलेशचा काही हात आहे का? याचा पोलिस तपास करत आहेत. (Pune Crime News)

कोण आहे निलेश घायवळ?

निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. तो मूळचा सोनेगाव, ता. जामखेडचा असून उच्चशिक्षित आहे. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्याने मास्टर इन कॉमर्सची डिग्री पूर्ण केली. मात्र, शिक्षण घेऊन नोकरी करण्याऐवजी तो गुन्हेगारी जगतात शिरला.

गजा मारणे गॅंगशी संबंध

2000 ते 2003 या काळात घायवळची भेट गजानन मारणे याच्याशी झाली. दोघांनी मिळून एका खुनाची घटना घडवली आणि सात वर्षांची शिक्षा भोगली. जेलमधून सुटल्यानंतर घायवळ आणि गजा मारणे यांच्यात आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यामुळे दोघांमध्ये वैराचे नाते तयार झाले.

 पुण्यातील दहशत

घायवळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, खंडणी वसुली, मारामारी आणि परिसरात दहशत निर्माण करणं असे तब्बल 23 ते 24 गुन्हे पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. कोथरूड परिसरातील सुतारवाडीत तर त्याची मोठी दहशत होती.

गजा मारणे गॅंगने त्याच्यावर दोन वेळा जीवघेणे हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून घायवळ टोळीनेही हिंसक कारवाया केल्या. यातील सर्वात गाजलेला गुन्हा म्हणजे दत्तवाडीत गुंड सचिन कुडले याची हत्या. कुडलेचा रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलने खून करण्यात आला. या घटनेनंतर निलेश घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली.

तुरुंगातून सुटका

2019 मध्ये घायवळ जामिनावर सुटला. इतर खटल्यांतूनही हळूहळू जामीन मिळवत 2023 मध्ये तो अखेर पूर्णपणे तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर तो पुन्हा खंडणी, टोळीयुद्ध आणि विविध हिंसक गुन्ह्यांत गुंतल्याचं समोर आलं.

 "बॉस" नावाचा दबदबा

निलेश घायवळ हा ई-कॉमर्सचा विद्यार्थी असून शिक्षण घेत असतानाच गुन्हेगारीकडे वळला. पुण्यातील गल्लीबोळात "बॉस" या नावाने त्याची ओळख होती. त्याच्या नावाचा दबदबा आजही गुन्हेगारी जगतात चर्चेत असतो.