पुणे : काहीही झालं तरी पुण्याची निवडणूक  (Pune Lok Sabha Constituency)  एकहाती होऊ देणार नाही. कोणीही उमेदवारी दिली नाही तर मी पुण्याच्या विकासासाठी अपक्ष लढणार पण पुण्याची लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार, असा चंग वसंत मोरेंनी (Vasant More) बांधला होता. या निवडणुकीदरम्यान ते रुसले, फुगले, मनसेचा राजीनामा दिला, उमेदवारीसाठी फिर फिर फिरले अन् अखेर वसंत मोरे पुण्याच्या मैदानात उतरले आहे. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)  आणि मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याविरोधात आता ते उभे ठाकणार आहेत. 


 भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भुमिकेनंतर वसंत मोरेंना मनसेच्या स्थानिक नेत्यांकडून त्रास व्हायचा. त्यांचं खच्चीकरण केलं जायचं, असं वसंत मोरे म्हणायचे. त्यांनतर मनसेवर ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या.  मनसेच्या नेत्यांनी डावललं. राज ठाकरेंनी डावललं, असे अनेक आरोप वसंत मोरेंनी मनसेवर केले. त्यानंतर मनसेवर नाराज असलेले, रुसलेले वसंत मोरे यांनी पक्षात माझा सतत अपमान होत आहे, हे मी आता सहन करु शकत नाही म्हणत मनसेचा राजीनामा दिली. राजीनामा दिल्यानंतर त्यांना अनेक पक्षातून फोन आले. अनेक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना पक्षातच येण्याची ऑफर दिली मात्र उमेदवारी जिथे मिळेल तिथेच जाणार यावर वसंत मोरे ठाम होते. 


राजीनामा देण्यापूर्वी मनसेवर नाराज असलेल्या वसंत मोरेंनी अचानक जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काहीच दिवसात वसंत मोरेंनी एक फेसबूक पोस्ट केली आणि थेट मनसेला राम राम ठोकला. येत्या काहीच दिवसांत भूमिका स्पष्ट करेन, असं म्हणत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवारांची भेट घेतली. मुंबईत जाऊन संजय राउतांची भेट घेतली आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याची मागणी केली. प्रत्येकवेळी त्यांनी मी पुणे लोकसभेसाठी इच्छूक असल्याचं बोलून दाखवलं. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि त्यात रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाली. हे पाहताच वसंत मोरे बुचकळ्यात पडले.


 महाविकास आघाडीच्या उमेदवारीची शक्यता संपल्यानंतर त्यांनी अनेक पर्यायांचा शोध घेतला. त्यानंतर ते मराठा समाजाच्या बैठकीत गेले होते. त्यांना मराठ्यांकडून उमेदवारीची चर्चा रंगत असतानाच वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. मुंबईतील राजगृहावर त्या दोघांची भेट झाली. या भेटीनंतर वंचित वसंत मोरेंना उमेदवारी देणार का?,असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर काल वचितची उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि वसंत मोरेंचं या यादीत नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 


अनेकदा नाराज झाले. टीका केल्या. फेसबूक पोस्टवरुन टीका केली. प्रत्येक पक्षाच्या भेटी घेतल्या अनेक नकार पचवले मात्र खासदारकीसाठी लढण्याचा निर्धार सोडला नाही. अखेर आता वसंत मोरेंना वंचितकडन उमेदवारी जाहीर झाली आणि आता ते पुण्याचं मैदान काबीज करायला तयार झाले आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Vasant More : रवींद्र धंगेकर की मुरलीधर मोहोळ कोण टफ फाईट देणार? वसंत मोरेंचं 'तात्या स्टाईल' उत्तर...