पुणे : पुण्यात अलीकडेच झालेल्या टोळीयुद्धानंतर आता सामान्य नागरिकांनाही गुंडांच्या दहशतीला सामोरं जावं लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायवळ(nilesh Ghaywal) टोळीच्या सदस्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला.गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ (Prakash Dhumal) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही जीवघेणी कारवाई करण्यात आली.गोळीबार होताच जीव वाचवण्यासाठी प्रकाश धुमाळ जवळील एका इमारतीकडे धावले. यावेळी स्थानिक सचिन गोपाळघरे यांनी धुमाळ यांना मदत केली. घायवळ टोळीतील मयूर कुंबरे याने थेट गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान हा घटनेसह आरोपींना आणखी एका सामान्य नागरिकावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)
त्या खिडकीतून पाणी मागून घेतलं होतं
यागोळीबाराच्या घटनेनंतर प्रकाश धुमाळ यांना मदत करणारे स्थानिक सचिन गोपाळघरे यांनी एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय घडलं होतं ते सांगितलं आहे. मी इथेच राहणारा आहे, रात्री आम्ही झोपायला चाललो होतो, तेव्हा आवाज झाल्यानंतर पाहिलं तेव्हा ते चौघेजण या ठिकाणी बसले होते. त्यांना विचारलं काय झालं? तेव्हा ते म्हणाले तुम्ही खाली जाऊ नका. मी त्यांना म्हटलं काय झालं. ते म्हणाले खाली फायरिंग झालं. आम्ही जेवायला गेलो होतो, तिथे थांबलेलो तेव्हा फायरिंग झालं. कोणाला लागलं आहे असं मी विचारलं. त्यावर ते म्हणाले एकाला मानेला गोळी लागली आहे. ही सर्व घटना घडली त्यानंतर गोळी लागल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी ते शेजारील इमारतीवर जवळपास अर्धा ता बसून राहिले, तोपर्यंत पोलिस आलेले नव्हते, मी त्यांना म्हटलं पाणी वगैरे देऊ का त्यांनी त्या खिडकीतून पाणी मागून घेतलं होतं, मग मी म्हटलं जवळ आहेत पाणी घेऊन जावं. त्यांना गोळी लागली होती. त्यामुळे त्यांच्या अंगातून रक्त वाहत होतं. इथे खाली रक्त पडलं आहे. वरती देखील रक्त सांडलं होतं. गोळी लागली तो एक आणि त्याच्यासोबत तिघेजण होते ते सर्वजण इथे थांबले होते, ते म्हणाले आम्ही सर्वजण जेवून इथे आलो होतो अचानक आमच्यावरती फायरिंग झाली असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर अर्धा तासाने ते निघून गेले
साधारण अर्धा तास ते चार जण इथे बसून होते. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात जा आणि पोलीस कम्प्लेंट करा. त्यानंतर अर्धा तासाने ते निघून गेले आणि अर्ध्या तासाने पोलीस आले. याच्या आधी इथं असं कधी झालं नाही. आम्ही घराच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला हे सगळं कळलं. याआधी कधीही अशा घटना घडली नाही. कायमच इकडे रहदारी असते. तिथे ओळखीचे कोणी नव्हते. आम्ही त्यांना पाणी दिलं आणि लवकरात लवकर दवाखान्यात जाण्यासाठी सांगितलं. ते पोलिसांचा नंबर मागत होते. त्यांना शंभर नंबर ला कॉल करा असं सांगितलं आणि पोलिसांना बोलून घ्यायला सांगितलं. अर्धा तासानंतर ते इथून निघून गेले. पोलीस स्टेशन हे ही गोळीबाराची घटना घडली तिथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. इथल्या नागरिकांनी सांगितलं की घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने पोलीस घटनेच्या ठिकाणी आले. प्रकाश धुमाळ हे अर्धा तास आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसले होते. स्थानिक नागरिकांनी प्रकाश धुमाळ यांना पाणी दिलं आणि मदत केली पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्या ठिकाणी आले, असंही सचिन गोपाळघरे यांनी सांगितलं.
मानेला आणि मांडीला गोळी लागलीय
गाडीला साईड दिली नाही म्हणून कोथरुड भागात गोळीबार करण्यात आला आहे. निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पुण्यातील कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. मध्यरात्री कोथरुड भागात ही घटना घडलीय आहे. प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने गोळीबार केलेला आहे. तीन गोळ्या झाडल्यात. मानेला आणि मांडीला गोळी लागलीय.
पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
याप्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती देताना सांगितलं की, ही घटना काल रात्री कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी केवळ गोळीबार नाही केला तर अजून एकाला कोयत्याने मारहाण देखील केली आहे. काल रात्री या आरोपींनी दोन जणांना मारहाण केली आहे. काल रात्री १२ च्या दरम्यान गोळीबार घडला आणि त्यानंतर याच आरोपींनी अजून एका व्यक्तीला कोयत्याने मारहाण केली आहे. प्रकाश धुमाळ अस गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर वैभव साठे याला कोयत्याने मारहाण केली. चार आरोपी दोन गाड्यांवर आले आणि गोळीबार केला.
निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का याची चौकशी सुरू
आम्ही इथले भाई आहोत म्हणत गोळीबार केला. एक गोळी फायर केली होती आणि ती त्या इसमाच्या मांडीवर लागली. याच आरोपींनी रात्री अजून एकाला कोयत्याने मारत जखमी केलं आहे. हे सगळे घायवळ टोळीचे सदस्य आहेत. हे सगळे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत काल रात्री २ गुन्हे यांच्यावर दाखल केले आहेत. अनेक मोका आणि ३०७ या आरोपींवर याआधी दाखल आहेत. निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. मयूर कुंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख आणि इतर काही आरोपींवर गुन्हा दाखल असून यांना ताब्यात घेतले आहेत. मारणे टोळीवर याआधी मोका लावला आहे यात देखील योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.