पुणे: पुणे शहर परिसरातील गजबजलेल्या शास्त्री चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध BMW कार उभी करून लघुशंका करून त्याने जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भर रस्त्यावर कार उभी करून लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार घडला, त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांसह नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अखेरीस या तरूणांवर गुन्हा दाखव करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याआधी काल गौरव आहुजाने गायब झाल्यानंतर माफी मागतानाचा व्हिडिओ शेअर केला. पण तो पोलीस स्टेशनला हजर झाला नाही. त्याने 8 तासांचा वेळ मागितला. पण, त्याच्या या मागणीमुळे संशय निर्माण झाला आहे. 


8 तासात हजर होतो...


पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकामध्ये लघुशंका करून अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाने काल (शनिवारी) संध्याकाळच्या वेळी दोन व्हिडीओ शेअर केले होते. गौरवने हात जोडून पुणेकरांची, आणि सर्वांची माफी मागितली. पण, पुणे सहराच्या आसपास राहून त्याने पोलीस स्टेशनला हजर होण्यासाठी 8 तासांचा वेळ मागितला होता. आपलं अश्लील कृत्य आणि चूक कबुल केली आणि तरीही पोलिसांसमोर हजर होण्यासाठी वेळ मागत असल्यामुळे त्याच्याबाबत अनेक संशय व्यक्त केले जात आहे. मुळात एखाद्या दारूड्या आरोपीला जेव्हा पोलीस ताब्यात घेतात तेव्हा त्याची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्याच्या रक्तात किंवा लघवीमध्ये दारूचं प्रमाण किती होतं हे त्यावरून सिद्ध होतं. या गौरवने 8 तासांचा आणखी वेळ मागितला. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर चौकामध्ये लघुशंका करण्याआधी तो पहाटेपर्यंत बॅस्टिन पबमध्ये पार्टी करत होता, अशी माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिल्यानंतर तशी ती 72 तासांपर्यंत शरीरात राहते. दारू शरीरात किती वेळ राहते हे दारूचं प्रमाण, गुणवत्ता आणि पिण्याची पद्धत यावरती अवलंबून असते. चाचणीनुसारही त्याची वेळ देखील बदलते. म्हणजे, रक्त तपासणीत दारूचं प्रमाण 6 तासांपर्यंत, श्वासोच्छवासाच्या तपासणीत 12 ते 24 तास, लघवीच्या चाचणीत 72 तास, लाळेच्या चाचणीत 12 ते 24 तास दारूचं प्रमाण समजतं. त्यामुळे आता या गौरवने जवळपास घटना घडल्यानंतर 12 ते 24 तासानंतर पोलिसांसमोर हजर राहण्याचा प्लॅन तर केला नसेल ना, असा संशय निर्माण झाला आहे.


मी आठ तासांत सरेंडर होईन!


माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य झाले, ते चुकीचे होते. मी जनता, पोलिस विभाग आणि शिंदे साहेब यांची मनापासून माफी मागतो. मला एक संधी द्या. मी पुढच्या आठ तासांत येरवडा पोलिस स्टेशनला हजर होईन. प्लीज माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्रास देऊ नका, अशी हात जोडून विनंती करीत गौरव अहुजा याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला आहे.


साथीदाराला केली अटक


बीअरची बाटली घेऊन कारमध्ये बसलेल्या तरुणाचे नाव भाग्येश प्रकाश ओसवाल (वय 22) असे असून, त्याला अटक केली आहे


गौरव आहुजावर आधी गुन्हे दाखल?


फेब्रुवारी 2021 मध्ये तत्कालीन पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रिकेट बेटिंगच्या गुन्ह्यात गौरव याला अटक केली होती. या हायप्रोफाइल रकेटमध्ये गैंगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी केले होते. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यात गौरव आहुजा, सुनील मखिजा तसेच अजय शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शनिवारी सकाळपासून व्हायरल झालेल्या लघुशंकेच्या व्हिडीओमुळे गौरव आहूजा पुन्हा चर्वेत आला असून, हा गौरव तोच आहे का, याचाही तपास सुरू आहे.