Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
Vidyanand Bapat : माझा जो लढा आहे तसाच चालू राहील. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करायचा असेल तर ध्वनी प्रदुषण होता कामा नये.

Vidyanand Bapat Marathi News: पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांची सध्या राज्यभरात सुरू आहे. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, काल विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असतानाच त्यांना मारहाण करण्यात आली. तर याच प्रकरणीवरती पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत त्यांनी त्यांच्या मागणीला विरोध करणाऱ्यांना आव्हान दिलं आहे.
विद्यानंद बापट म्हणाले की, माझा जो लढा आहे तसाच चालू राहील. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करायचा असेल तर ध्वनी प्रदुषण होता कामा नये. मी कोण आहे, हा मुद्दा नाही. प्रतिवाद करता येत नाही म्हणून असे प्रश्न, ध्वनिप्रदुषण तुम्ही लादताय. प्रतिवाद करता येत नाही म्हणून मारहाण केली जात आहे. रविवारच्या मोर्चात मी सहभागी होणार आहे, जिवंत असेल तर नक्की मी त्या मोर्चाला जाईन. केव्हा काय होईल सांगता येत नाही. जाण्याजोगा असेल तर नक्की जाईन, माझा लढा असाच सुरु राहणार, बऱ्याच मंडळांनी मिरवणूक काढल्या आहेत. मिरवणूका बंद केल्या तरी फरक पडत नाहीत, मिरवणूक काढायची असेल तर शहराबाहेरून मिरवणूक काढावी, असंही पुढे बापट यांनी म्हटलं आहे.
तर काल झालेल्या मारहाणीबाबत बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, भारतात युएससारखं शस्त्रा बाळगण्याचा अधिकार हवा स्वसंरक्षणासाठी, अमेरिकेत लोक बाहेर पडतानाही शस्त्र बाळगतात, आपल्याकडे तसं नाही. वेगवेगळ्या गणेश मंडळांकडून पोलिसांना विद्यानंद बापट यांच्या विरोधात तक्रार देण्यात येणार आहे. विद्यानंद बापट यांनी भावना दुखावल्या, दोन समाजात तेढ निर्माण केली, सार्वजनिक शांततेस बाधा आणली असा आरोप आहे. त्याबाबत बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला, भावना ही दुखायची गोष्ट नाही. तार्कीक प्रतिवाद करता येत नाही म्हणून कांगावा अशी स्थिती, माझा रोजगार म्हणून गदा आणू नका असं म्हणता येणार नाही असंही बापटांनी म्हटलं आहे.
ध्वनी प्रदूषण आणि उत्सवाबाबत विद्यानंद बापट म्हणाले, उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदूषणावर आणि डीजेच्या वापरावर बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्वच धर्मांच्या उत्सवांमध्ये आवाजावर मर्यादा असणे अत्यंत गरजेचे आहे. ध्वनी प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कोलाहलात संवाद साधणे किंवा विचार मांडणे अशक्य होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा सर्वात आधी हाताळणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आत्मसंरक्षण आणि शस्त्राधिकाराची भूमिका मांडताना विद्यानंद बापट म्हणाले, भारतातही अमेरिकेतील दुसऱ्या घटनेनुसार (Second Amendment) मिळणाऱ्या सार्वत्रिक शस्त्राधिकारासारखा (Right to Self-Preservation) मूलभूत अधिकार असावा, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणे ('कन्सिल्ड कॅरी') आणि रस्त्यावर शस्त्रे दाखवून दहशत माजवणे ('ब्रँडिशिंग') यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. पुण्यात 'कोयता गँग'सारख्या घटनांद्वारे होणारे प्रदर्शन हे केवळ गुन्हेगारी कृत्य आहे, त्याचा आत्मसंरक्षणाशी काहीही संबंध नाही. या भूमिकेमुळे स्वतःवर फॅसिस्ट असल्याचा होणारा आरोप फेटाळत त्यांनी स्पष्ट केले की, अस्मितांच्या नावावर समाजात फूट पाडणारे खरे फॅसिस्ट असतात आणि आपण त्याचा तीव्र विरोध करतो.
गणेशोत्सवातील आवाजाच्या मर्यादा या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (Guidelines) ठरवलेल्या आहेत. जर कोणाला या नियमांना आव्हान द्यायचे असेल, तर त्यांनी न्यायालयात गेले पाहिजे. याशिवाय, मूर्ती विसर्जनामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणावर बोलताना त्यांनी सांगितले की, शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत उच्च न्यायालयानेही सरकारला सुनावले आहे. उत्सवातील ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषण या दोन्ही समस्या तितक्याच गंभीर आहेत, असंही बापट म्हणालेत. 'भावना दुखावणे' आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बापट म्हणाले, आपल्या भूमिकेमुळे लोकांच्या 'भावना दुखावल्या' जातात या आरोपावर बोलताना त्यांनी सांगितले की, ही केवळ एक तक्रार किंवा कांगावा आहे. समोरच्या मताचा तार्किक प्रतिवाद करता येत नाही, म्हणूनच असा कांगावा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघानेही (UN) अशा ईशनिंदा किंवा भावना दुखावण्यासंबंधीच्या जाचक कायद्यांना हटवण्याची शिफारस केली आहे. इतिहास आठवताना त्यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांच्या काळात सार्वजनिक उत्सव सुरू झाले, तरी न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी बुद्धीप्रामाण्यवादी विचार मांडले होते. हिंसाचाराचा आश्रय न घेता प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
वैयक्तिक पार्श्वभूमी आणि नास्तिकता कशी आली याबाबत बोलताना बापट म्हणाले, कोकणातील (रत्नगिरी) परंपरेनुसार त्यांच्या घरीही आधी गणपती बसत असे, परंतु त्याचा आजच्या नास्तिकतेवर काही प्रभाव पडत नाही. जगभरातील प्रसिद्ध नास्तिक विचारवंत (उदा. रिचर्ड डॉकिन्स किंवा डॅन बार्कर) हे लहानपणी धार्मिक वातावरणातच मोठे झाले होते, पण वयोमानानुसार आणि बुद्धीप्रामाण्यवादातून त्यांची नास्तिकता विकसित झाली, असे सांगत त्यांनी आपल्या जीवनदृष्टीची मांडणी केली.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















