Vidhanparishad Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अशातच अनेक ठिकाणी बंडखोरी देखील होण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशातच पुण्यातून राष्ट्रवादीकडून विलास लांडे हे इच्छुक होते. मात्र, तिथे विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर विलास लांडे यांनी थेट पक्षावरच टीका केली आहे. दरम्यान, त्यांची समजून काढण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे भेट घेतली आहे.
अनेकजण नाराज असतील तर त्यांची खदखद दूर करण्यासाठी आम्ही मार्ग काढू
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी दिली, अशी टीका माजी आमदार विलास लांडे यांनी थेट पक्षावर केली आहे. त्यानंतर मनधरणी करण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील नाराज लांडेंच्या घरी पोहोचले. मी लांडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय, ते नाराज नाहीत. पुणे विधानपरिषदेच्या अनुषंगाने पक्षात अनेकजण नाराज असतील तर त्यांची खदखद दूर करण्यासाठी आम्ही मार्ग काढू, असा विश्वास वळसेंनी व्यक्त केला. मुळात सुनील टिंगरेंचा डमी अर्ज आहे. तसेच दिलीप मोहिते काही वेगळी भूमिका घेतायेत, अशी माहिती माझ्यापर्यंत तरी नाही. त्यामुळं महायुतीतून पुणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणी बंडखोरी करणार नाही, असा दावा वळसेंनी केला.
राज्यातील 17 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण?
1. सोलापूर : काँग्रेस मविआचे आदित्य फत्तेपूरकर विरुद्ध भाजप महायुतीचे राजेंद्र राऊत
2. अहिल्यानगर - काँग्रेस मविआचे करण ससाणे विरुद्ध भाजप महायुतीचे प्राजक्त तनपुरे
3. ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे अभिजीत पवार विरुद्ध शिवसेना महायुतीचे रविंद्र फाटक
4. जळगाव : शिवसेना ठाकरे मविआचे शरद तायडे विरुद्ध भाजप महायुतीचे नंदकिशोर महाजन
5. सांगली-सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे बाळासाहेब पाटील/अभयसिंह जगताप विरुद्ध भाजप धैर्यशील माने
6. नांदेड : काँग्रेस मविआचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर
7. यवतमाळ : काँग्रेस मविआचे साहेबराव कांबळे विरुद्ध शिवसेना महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी
8. पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे श्रीकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे विक्रम काकडे
9. भंडारा-गोंदिया : काँग्रेस मविआचे दिलीप बनसोड विरुद्ध भाजप महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर
10. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अनिकेत तटकरे
11. नाशिक : मविआचा उमेदवार नाही, अपक्ष विरुद्ध शिवसेना महायुतीचे नरेंद्र दराडे
12. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : काँग्रेस मविआचे शैलेश अग्रवाल विरुद्ध भाजप महायुतीचे अरुण लखानी
13. अमरावती : काँग्रेस मविआचे हर्षदीप देशमुख विरुद्ध भाजप महायुतीचे प्रवीण पोटे
14. धाराशिव-लातूर-बीड : काँग्रेस मविआचेचे महेश देशमुख विरुद्ध भाजप महायुतीचे बसवराज पाटील
15. परभणी-हिंगोली : शिवसेना मविआचे डॉ. विवेक नावंदर विरुद्ध शिवसेना महायुतीच सईद खान
16. छत्रपती संभाजीनगर-जालना - शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप किंवा शिवसेना
17. नागपूर (पोटनिवडणूक) : काँग्रेस मविआचे अतुल लोंढे विरुद्ध भाजप महायुतीचे डॉ. राजीव पोतदार