पुणे: नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, पुण्यातील ठाकरेच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंसह (Vasant More) त्यांच्या मुलाचाही पराभव झाला. त्यांनी या निवडणुकीवर आणि आकडेवारी आणि मतमोजणीतील फरकावर आक्षेप नोंदवला आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला आहे. महानगरपालिकांनी आयुक्तांना दिलेली आकडेवारीवरती आणि झालेली मतमोजणीची आकडेवारी यांच्यातील फरक सांगत आक्षेप घेतला आहे. करमकर नावाच्या निवडणूक अधिकारी यांनी आयुक्तांना दिलेली मतदार आकडेवारी आणि प्रत्यक्षात मतमोजणी आकडेवारी याच्यामध्ये फरक असल्याचं मोरेंनी निदर्शनास आणून दिलं आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी निवडणूक निकालाची आकडेवारीची प्रत पोस्ट करत टीका केली आहे. जनतेचा कौल मान्य आहे, मात्र अधिकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकून दिल्याची टीका वसंत मोरे यांनी केली आहे.(Vasant More)
वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट
"निवडणुकीचा निकाल लागला तो जनतेचा कौल नसताना काही अंशी तो आम्ही मान्य करतोय, पण निवडणूक निर्णय अधिकारी सौ. करमरकर मॅडम यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त पुणे मनपा यांना मतदानाच्या दिवशी रात्री १०:००वा. प्रभाग क्रमांक ३८ ची एकूण मतदान करणाऱ्याची संख्या ७९ हजार ८२६ इतकी जाहीरपणे सांगीतलेली असताना मतदान मोजणीचे दिवशी मात्र ७८ हजार ७१८ इतकीच मते का मोजण्यात आली ? म्हणजे ११०८ मते कमी कशी काय झाली ? याच करमरकर मॅडम यांच्या अधिकारातील प्रभाग ३६ आणि प्रभाग ३७ मधील मतदान आधीच्या दिवशी जाहीर केलेल्या मतदानापेक्षा वाढले असताना फक्त प्रभाग ३८ मधीलच मतदान ११०८ ने कमी कसे काय होते आणि नेमकी मला १०११ मतेच कमी पडतात ? याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल...", असं वसंत मोरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, त्याचबरोबर त्या आकडेवारीचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे.
वसंत मोरेंचा महापालिका निवडणुकीत १०११ मतांनी पराभव झाला
सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेले आणि गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिका निवडणुकांची तयारी करणारे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मैदानात उतरलेल्या वसंत मोरेंचा महापालिका निवडणुकीत १०११ मतांनी पराभव झाला. वसंत मोरेंनी पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली, त्यांना भाजपच्या उमेदवारांचं आव्हान होतं. त्यामुळे, गेल्या २ पराभवानंतर वसंत मोरेंसाठी ही लढाई प्रतिष्ठेची आणि अस्तित्व सिद्ध करणारी होती. वसंत मोरे यांनी प्रभाग क्रमांक ३८ मधून निवडणूक लढवली होती, येथील प्रभाग क्रमांक ३८ मधून भाजप उमेदवार व्यंकोजी खोपडे विजयी झाले असून त्यांना २१,८७८ मतं पडली आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे यांना २०,८६८ मतं मिळाली आहेत. म्हणजेच, वसंत मोरे यांचा १०११ मतांनी पराभव झाला आहे. येथे शिंदेंच्या शिवसेनेचे स्वराज बाबर यांना १६,१२२ मतं मिळाली आहेत.
महानगरपालिकेतील पराभवानंतर त्याच रात्री वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह करत निवडणूक आयोगाच्या मतदान टक्केवारी, झालेल्या मतदानाच्या आकेडवारीवरुन काही प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील फरक पाहता, दुसऱ्या दिवशी १०३५ मत वाढलेली दिसत असून मी १०११ मतांनी पराभूत झालो आहे, असे वसंत मोरेंनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने जी प्रेस नोट दिली, त्यानुसार ७९,८२६ मतदान झालं आहे. मात्र, आता तो आकडा ७८,७१९ कसा काय होतो? असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, शेवटच्या २ तासांत १६ टक्के मतदान वाढलं आहे, मला त्यात जायचं नाही. मात्र, ३६, ३७ आणि ३८ या तीन प्रभागातील मतदानाची आकडेवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार, ३६ आणि ३७ मध्ये १०० ते १५० मतांचा फरक आहे. मात्र, माझ्या प्रभाग 38 मध्ये एवढा मतांचा फरक कसा? असा सवालही मोरेंनी उपस्थित केला.
