पुणे :  पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या (vaishnavi hagwane death) प्रकरणाची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तर हगवणेंच्या बचावासाठी त्यांच्याकडून वैष्णवीच्या चरित्र्यावरती बोट ठेवलं जात आहे. या घटनेनंतर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे परिवाराला मदत करणाऱ्या त्यांच्या मित्रमंडळींची माहिती समोर आली आहे, हगवणेंच्या घराशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या निलेश चव्हाण, चोंधे भाऊ यांच्यावरती पत्नीला छळल्याचे मानसिक आणि शारिरीक त्रास दिल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर हगवणेंची त्यांची बाजू कोर्टात मांडणारा त्यांच्या वकीलांवरती देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. हगवणे यांच्यासोबतच त्यांची मित्रमंडळी देखील आपल्या घरातल्या स्त्रीयांचा छळ करण्यात आघाडीवर होते, असं दिसून आलं.(vaishnavi hagwane death)

Continues below advertisement


बायकोचा छळ करणारं रॅकेटच जणू वैष्णवीच्या मृत्यूनंतरच्या तपासामुळे उजेडात आलं आहे. शंशाक हगवणे, सुशील हगवणे, निलेश चव्हाण, सुयश चोंधे आणि संकेत चोंधे अशी बायकांना त्रास देणाऱ्या आरोपींची नावं आहेत. हे पाच जण वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडली गेलेली आहे आहेत. हे सर्वजण घरातल्या बायकांवर दादागिरी करुन पुरुषार्थ गाजवताना दिसले. या पाच जणांचे कारनामे तपासामध्ये समोर आले आहेत.यांची काळी कुंडली आता समोर आली आहे. 


शंशाक हगवणे


 वैष्णवी आणि शशांकने प्रेमविवाह करायचं ठरवलं होतं. वैष्णवीने घरी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तिच्या माहेरच्यांनी (कस्पटे) यांनी हगवणे (Vaishnavi Hagawane Death) कुटुंबीयांची माहिती गोळा केली. तेव्हा त्यांना हगवणे कुटुंबीयांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती समजली. त्यामुळे त्यांनी वैष्णवीला समजावून तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देण्याचे प्रयत्न केले. मात्र, शशांकने त्या प्रयत्नांमध्ये खोडा घालणं सुरु केलं. वैष्णवीला पाहायला आलेल्या दोन मुलांना शशांकने फोन केला आणि त्यांना धमकावलं देखील. वैष्णवी आणि मी लग्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका असं शशांकने वैष्णवीला पाहायला आलेल्या त्या दोन मुलांना सांगितलं होतं. त्यामुळे वैष्णवीच्या वडिलांसमोर तीच लग्न शशांकशी लावून देण्याशिवाय पर्याय उरला नाही. वैष्णवीच्या वडिलांची मालमत्ता आणि त्यांच्याकडून मिळू शकणारा हुंडा पाहून हगवणे कुटुंबाने तिला आणि तिच्या माहेरच्यांना अशाप्रकारे जाळ्यात अडकवलं. शेवटी घरातील नको म्हणत असतानाही वैष्णवीने शंशाकसोबत लग्न केलं.


लग्नात हुंड्यात फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोनं, चांदी भांडी आणि इतर काही गोष्टी घेऊनही आपल्या घरातल्यांच्या मोठ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शंशाक बायकोला त्रास देत होता. आपल्या सोन्यासारख्या बायकोला शंशाकने पैशांच्या हव्यासापोटी त्रास द्यायला सुरूवात केली. हळूहळू त्रास वाढला मारहाण होऊ लागली, त्यानंतर तिच्या चरित्र्यावर संशय घेण्यात आला, शेवटी तिने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.


सुशील हगवणे  


शंशाकचा मोठा भाऊ असलेला सुशील देखील वैष्णवीच्या छळात सामील होता असं तक्रारीत नमूद आहे. सुशील देखील वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी अटकेत आहे. सुशील हगवणे याची बायको मयुरी देखील हगवणेंच्या छळाला कंटाळून माहेरी निघून गेली. सुशील आपल्या पत्नीला देखील घरातील व्यक्तींच्या जाचातून मुक्त करू शकला नाही.


निलेश चव्हाण 


हगवणे परिवाराच्या घरच्या गोष्टींमध्ये कायम लुडबुड करणाऱ्या आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर वैष्णवीचं बाळ आपल्या ताब्यात ठेवणारा निलेश चव्हाण गेल्या आठवड्याभरापासून फरार आहे. त्याचा पोलिस तपास करत आहेत. या निलेश चव्हाणचा इतिहास देखील काळा आहे, तो देखील पत्नीचा छळ करायचा अशी माहिती समोर आली आहे. इतकंच काय तर निलेश चव्हाणने आपल्या बायकोला न माहिती होता, रूममध्ये स्पाय कॅमेरा बसवला होता. तो आपल्या बायकोचे अश्लील व्हिडीओ शूट करायचा. पत्नीला धमकावणं, मारहाण करणं, मानसिक छळ करणं अशा विकृत मानसिकतेचा हा निलेश आहे. 


3 जून 2018 ला निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली. एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप उघडून पहिला असता, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले. 


चोंधे बंधु


राजेंद्र हगवणेंना फरार होण्यासाठी आपली अलिशान वाहनं पुरवणारे सुयश आणि संकेत चोंधेही काही वेगळे नाहीत. त्यांनीही आपल्या बायकांना छळल्याचं आता उघड झालं आहे. संकेत चोंधे आपल्या वहिनीला त्रास द्यायचा. तर सुयश चोंधेच्या विरोधात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सुयश चोंधेची पत्नी धनश्रीने मिडीयासमोर येत चोंधेंच्या वागण्याचा पाढा वाचला होता. 


हगवणेंच्या वकिलावरतीही गुन्हा दाखल


पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकिल दुशींग हे 2022 मधे एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरुन त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला‌. त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशींग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटक पुर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.