पुणे: वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. मात्र, आता अखेर ते बाळ कस्पटे कुटुंबियांकडे आलं आहे. वैष्णवीचं बाळ कस्पटेंकडे सोपवण्यात आलं आहे. एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्याने आम्हाला बोलवलं आणि बाळ आमच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितलं की, माझ्या भावाला एका अज्ञात व्यक्तीने ते बाळ आणून दिलं. बाळाच्या रूपाने आम्ही वैष्णवीला पाहतो आहोत. वैष्णवी म्हणून आम्ही पुढे त्या बाळाचा संभाळ करणार आहोत अशी माहिती अनिल कस्पटे यांनी दिली आहे. मला कोणाचाही फोन आला नाही, भावाला फोन आला होता.बाळ कुठे होतं ते माहिती नाही, असंही ते म्हणाले. वैष्णवीचे काका मोहन कस्पटे ज्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्यांनी माहिती देताना सांगितलं की, मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुम्ही बाणेर हायवेला या माझ्याकडे बाळ आहे. आम्ही त्यांना म्हटलं आम्ही पिंरगुटला चाललो आहोत. ते म्हणाले आम्ही बाणेर हायवेजवळ आहे, तिथे या बाळ माझ्या ताब्यात आहे. तिथे गेल्यानंतर बाळ त्यांनी आमच्या ताब्यात दिलं आणि ते तिथून निघून गेले. ते कोण होते त्याची कोणतीही माहिती नाही. दोन दिवसांपासून बाळाचा शोध सुरू होता, अशी माहिती मोहन कस्पटे यांनी दिली आहे. तर आमचं बाळ आम्हाला मिळालं आहे, त्यामुळे आम्हाला आंनद आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा अशा आयोगाने सूचना दिल्या आहेत. जर आरोप खरे असल्याचे आढळून आले तर सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयोगाने महाराष्ट्र पोलिसांकडून तीन दिवसांच्या आत सविस्तर कारवाई अहवाल मागितला होता, तो अहवाल आज पोलिसांकडून आयोगाला अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.
केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणेंची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे, पण एवढं करुन चालणार नाही. तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे. राज्य महिला आयोग पदी ही अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर आहेत, त्यांनी जे वक्तव्य दिलं ते योग्य आहे. पण त्यांनी अद्याप आम्हाला एकदा ही संपर्क साधला नाही. किंबहुना अजित पवार गटाकडून कोणीही आमचं सांत्वन करायला आलं नाही, अशी खंत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्ती केली.