पुणे: पिंपरीतील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला पाच दिवस उलटलेत, तरी अद्याप पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणेंना अटक का होत नाही? असा संतप्त सवाल विचारला जातो आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी आहेत, राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांना अटक होत नाही का? अशी ही चर्चा सध्या शहर परिसरात रंगलेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या मोठ्या सुनेने सुद्धा नोव्हेंबर 2024 मध्ये अशाच छळाला कंटाळून पौड पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र हगवणेंसह सासू, दिर आणि नंदेवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र राजकीय दाबावातून त्यावेळी कारवाई झाली नाही. आता ही याच दबावामुळे ही अटकेची कारवाई होत नाहीये का? असा प्रश्न विचारला जातो आहे. 16 मे 2025 ला वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आली आहे. पण सासरे राजेंद्र आणि दिर फरार आहेत. दरम्यान वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचबरोबर तिच्या नवऱ्यांने माहेरच्या आख्या खानदानाचा काटाच काढतो अशी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी
सासरच्या कुटुंबियांकडुन मानसिक त्रास सहन न झाल्याने दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळुन औषध (रेंट पॉईझन) जेवणातून खावून स्वःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती एफआयआरमधून समोर आली आहे. जेव्हा पहिल्यांदा वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे तिचा जीव वाचला होता, तिच्यावरती 4 दिवस उपचार सुरू असताना तिचे सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी देखील दवाखान्यात गेले नाहीत, त्यानंतर वैष्णवीची तब्येत ठीक झाल्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवुन देण्यात आलं. त्यानंतर साधारण 15 दिवसानंतर तिचा पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्याने जावई शशांक यांनी घरी जावून वैष्णवी हिस 'तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय, मी तुला काय फुकट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो' असं म्हणत वैष्णवीला धमकी दिली होती. याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितलं असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
वैष्णवीला हुंड्यात काय दिलं?
- 51 तोळे सोन्याचे दागिने
- चांदीची भांडी
- फॉर्च्युनर गाडी
- लग्नानंतर चांदीची मूर्ती
- नुकतंच दीड लाखांचा मोबाईल
- माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी पन्नास हजार ते 1 लाख रुपये दिले
- जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी, ते न दिल्यानं छळ आणखी वाढला
मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने अन्
राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणात्सव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.