पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Death) प्रकरणानंतर आता शस्त्रपरवान्याबाबत देखील शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही भावांनी शस्त्रपरवाना मिळवण्यासाठी 2022 मध्ये पुण्यातील बनावट पत्ते पोलीसांना सादर केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली होती. त्या पत्त्यांची खातरजमा पोलीसांनी केली नाही. जालिंदर सुपेकर हे त्यावेळी पुणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. त्यांनी स्वतःच्या सहीने शस्त्र परवान्याच्या अर्जावर मंजुरीची सही केली होती. शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी पाच जणांची समिती असते. ज्यात पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील एकचा समावेश असतो. सुपेकर यांनी त्यावेळचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडुन भाच्यांच्या शस्त्रपरवान्याची फाईल मंजुर करुन घेतली आणि नोव्हेंबर 2022 मध्ये परवान्यावर सही केली अशी माहिती समोर आली, त्यावरती आता जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
जालिंदर सुपेकर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, शस्त्रपरवान्यासाठी अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात केला जातो. पोलीस ठाण्यातून तो पोलीस उपायुक्तांकडे येतो. पोलीस उपायुक्तांकडून तो मंजुरासाठी माझ्याकडे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन या नात्याने माझ्याकडे आला होता. मी तो प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मांडला. त्यांनी त्याला मान्यता दिल्यावर अंतिम सही अतिरिक्त आयुक्त म्हणून मी केली होती. यात महत्वाची भूमिका कोथरुड आणि वारजे पोलीसांची आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता, अशी माहिती जालिंदर सुपेकर यांनी दिली आहे.
सुपेकरांकडून उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला
जालिंदर सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप झाल्यानंतर गृह विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आला आहे. जालिंदर सुपेकर यांनी यापूर्वीच आपली बाजू मांडली होती. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Gangawane) हिची आत्महत्या आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही, असे सुपेकर यांनी सांगितले होते. मात्र आता सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांना शस्त्रपरवाना मिळवून देताना त्यांच्या मामांनी सुपेकरांनी मदत केल्याचं समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
वैष्णवीचा नवरा शशांक आणि दीर सुशील यांनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे याच्याविरोधात वारजे तर सुशील हगवणे कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हगवणे कटुंबीय पुणे ग्रामीणमधील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात. त्यामुळे त्यांनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलीसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलीसांनी दोघांचेही अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर दोघांनी ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते दिले. त्यासाठी ते भाड्याने राहत असल्याचे कागदपत्रे दाखवण्यासाठी भाडे करार तयार केला. शशांकने वारजेला तर सुशीलने कोथरुडला राहत असल्याचा पत्ता सादर केला. त्याआधारे पुणे पोलीसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी करण्यात आली. याप्रकरणी दोघां भावांवरती गुन्हा दाखल आहे