पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या सापडण्यामागची स्टोरी आता समोर आली आहे. निलेश चव्हाणच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळं त्याच्या पहिल्या लोकेशनचा क्लु पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाला. तर फेसटाईम कॉलने निलेशचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झालं आणि त्यानंतर दहा दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या पडल्या. 26 मे ला नेपाळमध्ये पोहचताच निलेशने तिथले सिम कार्ड घेतलं. याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला, याद्वारे त्याने अँपल फोनमधील फेसटाईम कॉलिंग केलं. फेसटाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही, असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागाने मोठा कस लावला आणि फेसटाईम कॉलिंगचे आयपी अड्रेस मिळवले. या आधारे त्यांना निलेशचे नेपाळमधील लोकेशन प्राप्त झाले. त्यामुळं निलेशला भारतात घटस्फोटित मैत्रिणीला सोबत घेऊन फिरणं आणि नेपाळमध्ये फेसटाईम कॉलिंग करणं भोवल्याचं दिसून आलं.
फिरायला जाऊ म्हणून मैत्रीणीला सोबत घेतलं
निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रीण त्याच्यासोबत होती. आपण फिरायला जाऊ असं त्याने त्याच्या मैत्रिणीला सांगून तिला सोबत ठेवलं आणि तिच्या फोनचा वापरही केला. पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला. तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते. मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली. मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली, परंतु तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला पोलिसांनी सोडून दिलं. मात्र तिच्याकडून दिल्लीतून गोरखपूरचा प्रवास केलेल्या खासगी बसची माहिती मिळाली आणि तिथेच पोलिसांनी निलेश चव्हाणला बेड्या घातल्या.
निलेश चव्हाणने पोलिसांना असा गुंगारा दिला?
- पैशांची देवाण-घेवाण करताना ऑनलाईन ट्रान्झिक्शन केलं तर पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून पुणे सोडताना त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली.
- सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले. काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले.
- नेपाळमध्ये ही स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केले.
- प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिमकार्ड घालून वापर करायचा.
- संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला.
- ऑनलाईन कॉलिंगवरुन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशी संवाद साधत होता.
- अनेकदा फोन बंद पडल्याचे बहाणे करत, त्या-त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या फोनचा आणि वाय-फायचा वापर केला.
- सीसीटीव्हीच्या साह्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील, म्हणून स्वतःच्या ऐवजी खाजगी वाहनाने प्रवास केला.