पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेला आरोपी नीलेश चव्हाण याला ३० मे (शुक्रवार) रोजी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. चव्हाणवर वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावणे, तिच्या मुलाला बळजबरीने ठेवणे, आणि शस्त्र दाखवून धमकी देणे यांसह अनेक गंभीर आरोप होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तत्काळ लूक आऊट नोटीस जारी केली होती. 29 मे रोजी त्याच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी झाली. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 30 मे रोजी, नीलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आलं आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलाची सहा पथके, तर पुणे पोलिसांची तीन पथके फरार निलेश चव्हाणच्या मागावर होती. या पथकांनी विविध ठिकाणी तपास केला. पुणे, मुंबई, कोकणसह परराज्यांमध्ये देखील त्याचा शोध सुरू होता. कर्नाटक, गोव्यातही तपास केला होता. त्याच्या संपर्कातील मित्र, नातेवाईक यांच्याकडेही कसून चौकशी केली जात होती. प्रामुख्याने पिंपरी चिंचवडचे गुंडाविरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट चार आणि सायबर सेलचे पोलिस अधिकारी, कर्मचारी निलेश चव्हाणचा शोध घेत होते. अशातच तांत्रिक तपासामुळे धागा मिळाला. नीलेश चव्हाण हा नेपाळ-भारत सीमेवरून सहा ते सात किलोमीटर आत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिस तिथपर्यंत पोहोचले. नीलेश चव्हाण हा भारतीय मोबाईल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. नीलेश चव्हाण नेपाळमधील सिम कार्डद्वारे तिथलं इंटरनेट वापरत होता. तांत्रिक तपासाद्वारे चव्हाणची माहिती मिळाली. चव्हाणकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
असा केला प्रवास
नीलेश चव्हाण गेले 10 दिवस फरार होता. सुरुवातीला तो पुण्यातून रायगड येथे गेला. तेथून दिल्लीला गेला. त्यानंतर दिल्ली, गोरखपूरमार्गे सौनौली, भैरहवमार्गे नेपाळ सीमेवरील काठमांडू असा प्रवास करत तो नेपाळमध्ये गेला. त्यानंतर तो भैरहव येथून उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सौनौली येथे आला. त्याची माहिती मागावर असलेल्य पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
निलेश चव्हाण प्रवास
पुणेमुंबईकर्जतरायगडदिल्लीगोरखपूरसोनोली (उत्तरप्रदेश)भैरवा (नेपाळ)काठमांडू नेपाळ भैरवा मार्गे सोनोलीमध्ये आल्यावर अटकनेपाळ मध्ये 25 मे दुपार ते 30 मे पर्यंत मुक्कामी
निलेश चव्हाणचा माग कसा काढला?
- 25 मे ला दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेशने खाजगी बसने प्रवास केला. तांत्रिक तपासात हे लोकेशन ट्रेस झालं. बसच्या सीसीटीव्हीने यावर शिक्कामोर्तब केला.- गोरखपूरमध्ये जिथं उतरला, त्यापुढं तो कुठं गेला? हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस करणं सुरू झालं.- पुढचं दोन-तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचं आढळलं.- 30 मे ला पिंपरी चिंचवड पोलीस भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथं पोहचले. त्यावेळी तो तिथं निदर्शनास आला अन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आळवल्या.