Vaishnavi Hagawane Case Karuna Sharma : ना पोलीस, ना महिला आयोगाकडून दखल! वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर करुणा शर्मांकडे महिलांच्या तक्रारी, रुपाली चाकणकरांना थेट इशारा
Vaishnavi Hagawane Case Karuna Sharma : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिलांवरील अन्यायाची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत.

Vaishnavi Hagawane Case Karuna Sharma : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर (Vaishnavi Hagawane Case ) महिलांवरील अन्यायाची अनेक प्रकरणं उघडकीस येत असून, त्यावर अद्याप ना पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे, ना महिला आयोगाने. या पार्श्वभूमीवर स्वतः न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी अन्यायग्रस्त महिलांसाठी आवाज उठवला आहे.
करुणा शर्मा यांच्याकडे न्यायाच्या शोधात धाव घेतलेल्या अनेक महिलांनी महिला आयोगाच्या निष्क्रियतेविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या राजीनाम्याची मागणी करत, "ज्या 35 हजार महिलांना तुम्ही न्याय दिला, त्या समोर आणा; अन्यथा आम्ही त्याच महिलांना घेऊन महिला आयोगावर मोर्चा काढू," असा स्पष्ट इशारा करुणा शर्मा यांनी दिला आहे.
ना पोलीस, ना महिला आयोगाकडून दखल
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता अशा अनेक महिला समोर येत आहेत, ज्यांच्यावर आपल्या नवऱ्याकडून आणि सासरच्यांकडून अत्याचार झाला आहे. महिलांसोबत लग्न करून त्यांच्या पतीने दुसरे लग्न करून पहिल्या पत्नी सोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. या महिलांनी महिला आयोगाकडे वारंवार तक्रार करून आणि पोलिसांकडे सुद्धा तक्रार करून कुठल्याही प्रकारची सहाय्यता किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे.
तर महिला आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार : करुणा शर्मा
न्यायासाठी महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा न्याय मिळत नसल्याने आता करुणा शर्मा यांच्याकडे आपली तक्रार घेऊन या पीडित महिला येत असून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर करुणा शर्मा यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला आहे. आपण न्याय दिलेल्या 35 हजार महिलांना समोर आणा. अन्यथा त्याच महिलांना समोर आणून आम्ही महिला आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा करुणा शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांना दिला आहे.
पतीने दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीला सोडलं
करुणा शर्मा यांच्याकडे आपली तक्रार घेऊन आलेली एक पीडित महिला 29 वर्षाची असून तिचे सासरे राजकारणात आहेत. वांद्रे कोर्टात या महिलेने लग्न केल्यानंतर सासरच्यांकडून हुंड्याची मागणी केली जात होती. शिवाय लग्न झाल्यानंतर सुद्धा सून म्हणून स्वीकार केला जात नव्हता. त्यानंतर या महिलेच्या पतीने दुसरे लग्न करून संबंधित पीडित महिलेशी पूर्णपणे संबंध तोडले. आता ही महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलासोबत आपल्या वडिलांच्या घरी राहत आहे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
महिला पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असूनही न्याय नाही
तर दुसरी महिला पंचवीस वर्षाची असून पाच वर्षांपूर्वी तिने मुंबईत लग्न केलं. मात्र, काही दिवसांपूर्वी तिच्या पतीने तिच्याशी संबंध तोडले आणि वेगळा राहायला लागला. शिवाय आपण दुसरे लग्न केल्याचं त्याने या पीडित महिलेला सांगितलं. ही महिला पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असताना सुद्धा तिला महिला आयोगाकडून किंवा पोलिसांकडून न्याय मिळालेला नाही, अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे.

























