पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane case) प्रकरणी गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी नीलेश चव्हाण याला काल (शुक्रवारी, ता 30) पकडण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आलं. नेपाळ सीमेवरून निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane case) मुलाची हेळसांड करणं, चुलत्यांसह इतरांना धमकावणं, याप्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल होता. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं नऊ महिन्यांचं बाळ नीलेशकडे होतं. हे बाळ घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना त्यांना बंदूक दाखवून धमकावल्याची, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली. यानंतर चव्हाण याच्यावर दिनांक 21 मे रोजी गुन्हा दाखल झाला. अटक होण्याआधीच तो फरार झाला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी लूक आऊट नोटीस जारी केली. त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी गुरुवारी नोटीस जारी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
निलेश चव्हाणचा माग कसा काढला?
- 25 मेला दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेशने खाजगी बसने प्रवास केला. तांत्रिक तपासात हे लोकेशन ट्रेस झालं. बसच्या सीसीटीव्हीने यावर शिक्कामोर्तब केला.- गोरखपूरमध्ये जिथं उतरला, त्यापुढं तो कुठं गेला? हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस करणं सुरू झालं.- पुढचं दोन-तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचं आढळलं.- 30 मे ला पिंपरी चिंचवड पोलीस भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथं पोहचले. त्यावेळी तो तिथं निदर्शनास आला अन् पोलिसांनी त्याच्या मुसक्या आळवल्या.
पुणे ते नेपाळ... नीलेशला पोलिसांनी कसा पकडला?
नीलेशने फरार असताना पुणे, मुंबई, कर्जत, रायगड असा प्रवास केला. रायगडनंतर नीलेश दिनांक 21 मे रोजी महाराष्ट्राबाहेर पडला. दिनांक 25 मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने गोरखपूर येथून दिल्लीला गेला. ज्या बसने तो प्रवास करीत होता, त्या बसमधील प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यात नीलेश दिसून आला. स्लीपर सीटवरून उतरत असताना, हाती पाण्याची बाटली घेतलेला नीलेश चव्हाण फिरताना पाहायला मिळाला. त्यानंतर तो सोनोली (उत्तर प्रदेश), भैरवा (नेपाळ) आणि काठमांडू येथे पोहोचला. नेपाळमधून भैरवामार्गे सोनोलीमध्ये आल्यावर नीलेशला अटक करण्यात आली आहे.
निलेश चव्हाणने पोलिसांना असा गुंगारा दिला?
- पैशांची देवाण-घेवाण करताना ऑनलाईन ट्रान्झिक्शन केलं तर पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून पुणे सोडताना त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली.- सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले. काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले.- नेपाळमध्ये ही स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केले.- प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिमकार्ड घालून वापर करायचा.- संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला.- ऑनलाईन कॉलिंगवरुन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशी संवाद साधत होता.- अनेकदा फोन बंद पडल्याचे बहाणे करत, त्या-त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या फोनचा आणि वाय-फायचा वापर केला.- सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील, म्हणून स्वतःच्या ऐवजी खाजगी वाहनाने प्रवास केला.