Pune Waterfall Accident:  माळशेज घाटाजवळील काळू धबधब्यात पर्यटनाला आलेले दोन व्यक्ती वाहून जात होते मात्र शिवनेरी ट्रेकर्सच्या पथकाने त्यांना बाहेर काढल्याने सुदैवाने ते बचावले. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर शनिवार आणि रविवारी गर्दी असते. माळशेज घाटाजवळील काळू धबधब्यावरही पर्यटकांची मोठी गर्दी असते. पुणे आणि मुंबईतील अनेक पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देतात. 


पावसाळ्यातील पर्यटनात पर्यटकांचा बेजबाबदारपणा सातत्याने दिसून येतो. दुसरीकडे सरकारी यंत्रणेची उदासीनताही समोर आली आहे. 31 जुलै रोजी कालू धबधबा परिसरात 50 पर्यटक पावसाळी सहलीसाठी आले होते. यातील चार तरुणी आणि एका तरुणाने अत्यंत धोकादायक असलेल्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला होता. अचानक पाय घसरल्याने एक तरुण व तरुणी वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान त्यांचे मित्र वाहून गेल्याचे पाहून इतरांनी आरडाओरडा सुरू केला.


त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवनेरी ट्रेकर्सच्या सदस्यांनी पुढाकार घेत त्यांना काही अंतरावरुन सुखरूप बाहेर काढले. शिवनेरी ट्रेकर्सचे हे सदस्य काळू धबधबा परिसरात सेफ्टी केबल्स बसवण्याचे निरीक्षण आणि सर्वेक्षण करण्यासाठी गेले असता अचानक अपघात झाला.


नागरीकांच्या अति उत्साहाने अपघात
पुण्याच्या आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य अनुभवायला अनेक नागरीक गर्दी करतात. अनेक नागरीकांना फोटो आणि सेल्फीचा मोह आवरत नाही. अति उत्साह दाखवतात. यामुळे गडकिल्ले आणि धोकादायक ठिकाणांवरील अपघातांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अनेक लहान मोठ्या धबधब्यामध्ये आतपर्यंत अनेकजण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे. त्याचबरोबर अनेकांनी जीव गमावला आहे. तरी देखील नागरीक खबरदारी घेताना दिसत नाही. 


प्रशासनाकडून आवाहन
धोकादायक ठिकाणी किंवा गडकिल्ल्यांवर जाताना योग्य काळजी घ्या. खबरदारी बाळगा, असं आवाहन प्रशासनाकडून कायम केलं जातं. त्याच्याकडून योग्य योजनादेखील आखली जाते मात्र नागरीकांच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे. माळशेज घाटाजवळ अनेक लहान मोठे धबधबे आहेत. प्रत्येक धबधब्यावर पर्यटक गर्दी करतात. निसर्गाचा आनंद लुटा मात्र खबरदारी घ्या, असं कायम प्रशासनाकडून सांगण्यात येतं.