Pune News: शंतनु कुकडेच्या खात्यावरून कोटींची उलाढाल, आयकर विभाग अन् ईडीला पुणे पोलिसांचं पत्र, दीपक मानकरांनी बँक खात्यात आलेल्या पैशांवर दिलं स्पष्टीकरण
Pune News: आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे. त्यावरती मानकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे: पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या शंतनू कुकडे प्रकरणी अपडेट समोर आली आहे. शंतनू कुकडेच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. शिक्षणाच्या निमित्ताने आणि मदतीच्या नावाखाली तो अनाथ मुलींना घरी आणून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे ( वय 53) याच्यासह काही जणांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शंतनू कुकडे वरती अनेक आरोप करण्यात आले होते. दरम्यान पोलिस तपासात कोट्यावधी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचं पोलिस तपासामध्ये समोर आलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गटाचे) शहराध्यक्ष दीपक मानकर यांची देखील चौकशी पुणे पोलिसांनी केली आहे. कुकडेशी संबंधित व्यक्तीसोबतच्या आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपावरून ही चौकशी करण्यात आली आहे. एकूण 50 कोटी रूपये कुकडेच्या खात्यावरून इतरांच्या खात्यांवर पाठवल्याचंही समोर आलं आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिस तपासात कुकडेच्या बँक खात्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली . त्यातील 40 ते 50 कोटी रुपये काहीच्या बँक खात्यावर पाठवल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. त्याबाबत देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात मानकर यांची चौकशी झाली आहे.
आयकर आणि ईडीला पोलिसांचे पत्र
शंतनू कुकडे याच्या खात्यात तब्बल शंभर कोटी रुपये आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. चेन्नईत कंपनी असून, त्याचा कुकडे संचालक होता. संचालक पद सोडल्यानंतर त्याच्या वाट्याचे शेअर्स कुकडेला मिळाले होते, ते शेअर्स विकल्यानंतर पैसे आपल्या खात्यात आल्याचे कुकडे सांगतो. त्याच्या खात्यातून चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. हे पैसे दहा ते पंधरा व्यक्तींपेक्षा अधिक लोकांच्या खात्यात गेले आहेत. पोलिसांनी याबाबत आयकर विभाग आणि ईडीला पत्र दिले आहे. कुकडे याच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडिटदेखील करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही महिलांच्या बँक खात्यात पाठवलेत पैसे
आरोपी शंतनू कुकडेच्या विरोधातील गुन्ह्यामध्ये सामूहिक बलात्काराचे कलम वाढवण्यात आल्याची माहिती आहे. काही महिलांच्या बँक खात्यात कुकडेकडून पाच ते साडेसात लाख रूपये पाठवले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कुकडे हा शहरासह लगतच्या जिल्ह्यात धरण परिसरातील हॉटेलमध्ये मोठे रॅकेट चालवत असावा, असा पोलिस यंत्रणेला संशय आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
दीपक मानकर या प्रकरणावर काय म्हणालेत?
रौनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे. तो रौनक याच्या सोबत झाला. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. हा आमच्या राजकीय बदनामीचा कट आहे. विनाकारण माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे असा इशार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी म्हटलं आहे.
























