Tribal Students Protest In Pune : आपल्या विविध 14 मागण्यांसाठी पुण्याच्या मांजरी परिसरात गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास प्रदीर्घ बैठक घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात असलं तरी उपोषणावर कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही.
मंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत. दरम्यान, 14 दिवसांच्या उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची चिंताजनक माहिती समोर येत आहे.
Minister Ashok Uikey Statement : मंत्र्यांनी दोन दिवसांची वेळ मागितली
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "आदिवासी विभागाचा मंत्री आणि एक पालक म्हणून मी विद्यार्थ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली आहे. आमची पोरं-पोरी आपल्या हक्कासाठी बोलू लागली आहेत, याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आमचे कोणतेही अडले नाही. काही तांत्रिक बाबींवर विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे."
दोन दिवसांत योग्य निर्णय घेऊन उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधला जाईल, असे आश्वासन मंत्री अशोक उईके यांनी दिले.
Tribal Students Demands : लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही
दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. शासकीय सेवा आणि शिक्षणातील बोगस आदिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे जागा मिळवलेल्या लोकांच्या याद्या सरकारने दोन दिवसांत जाहीर कराव्यात आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार हे स्पष्ट करावे. आमच्या सर्व 14 मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने ठोस वेळमर्यादा (Time Limit) सांगणे गरजेचे आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. सरकार ठोस आणि लेखी निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असंही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं.
Rahul Gandhi Pune Event Impact : राहुल गांधींच्या कार्यक्रमानंतर मुद्दा ऐरणीवर
काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने थेट आपले प्रश्न मांडले होते. त्यानंतर या उपोषणाकडे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राज्यभरातून लक्ष वेधले गेले. आता दोन दिवसांच्या मुदतीनंतर सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:
