पुणे : "ज्ञान, दान आणि बंधुभाव हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. कृतज्ञतेच्या भावनेतून वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहावे. सामाजिक सेवाकुंडच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संरक्षणाचे काम होईल. हा उपक्रम स्तुत्य असून, वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी पूरक ठरेल," असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल महामहिम आरिफ मोहम्मद खान यांनी केले.


डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या उद्घाटनप्रसंगी आरिफ मोहम्मद खान बोलत होते. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनंत भागवत, सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजीत गायकवाड, उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे, महासचिव अभिजित गायकवाड, खजिनदार रतनभाई चोईथानी, सचिव रमेश जाधव, विश्वस्त संजय कर्णिक, अनिल सोनपाठकी, अतुल भोसले, ऍड. महेंद्र दलालकर, महेश चौहान उपस्थित होते.


आरिफ मोहम्मद खान म्हणाले, "ज्ञान ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. मात्र, त्याचा प्रसार जितका व्हायला हवा होता, तसा झालेला नाही. आज ग्रामीण, आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात निरक्षरता आहे. आरोग्य व शिक्षणाच्या सोयीसुविधांचा अभाव आहे. सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या संस्था पुढे येत असतील, तर या समस्या सुटण्यास मदत होईल. डॉ. गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून हाती घेण्यात आलेला सेवाकुंड उपक्रम समाज परिवर्तनाच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावेल."


डॉ. अनिलकुमार गायकवाड म्हणाले, "समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, गरजूना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, आदिवासी व ग्रामीण भागातील गरजूना सर्वतोपरी साहाय्य करण्यासह उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे आदी उपक्रम सेवाकुंडच्या माध्यमातून हाती घेतले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सेवाकुंडचे कार्य सुरु आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार व पर्यावरण या चार क्षेत्रात येत्या काळात भरीव योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे."


यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉ. अनंत भागवत यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. नयन जयप्रकाश यांनी सूत्रसंचालन केले. नंदकिशोर शहाडे यांनी आभार मानले.