Pune Khadakwasla Dam News: पुण्यात (Pune) काल (11 जुलै 2022) झालेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. आता आम्ही आज दुपारी 12 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 3424 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक  5992 क्युसेक करण्यात येत आहे, असं स्वारगेटच्या मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.


पुणे शहराच्या आजुबाजूला चार महत्वाचे धरण आहे. त्यात खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणांचा समावेश आहे. पानशेत 35.82 टक्के पाणीसाठा, वसरगाव 33.58, टेमधर 21.88 आणि खड़कवासला 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात विसर्ग केल्या जात आहे. त्यामुळे आजुबाजूच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आजुबाजूच्या गावात पाणी शिरण्याची भीती आहे. दरवर्षी पावसामुळे अनेकांचं नुकसान होतं. त्यामुळे काळजी घेण्याचं आणि स्वत:चा बचाव करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. पावसाचं प्रमाण वाढलं तर विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.


धरण क्षेत्रात पाणी साठा कमी असल्याने पुण्यात पाणीकपात करण्यात आली होती. त्यामुळे अेनक परिसरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागणार होतं. मात्र आषाढी एकादशी आणि ईदच्या निमित्ताने पाणीकपात मागे घेण्यात आली होती. आता मात्र खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 


30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड
पुण्यात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पिक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.