Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पोटच्या दोन चिमुरड्या लेकरांना आईनेचे पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारल्याची घटना घडली. या क्रूर महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आज (8 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिढे या 30 वर्षीय महिलेला ताब्यात घेतलं आहे. शंभू दुर्योधन मीढे (वय 1 वर्ष) आणि पियू दुर्योधन मीढे (वय 3 वर्ष) अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मीढे (वय 35 वर्ष) याच्यावरही कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे.
तीन अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना
दरम्यान, तरुणांमध्ये मोबाईल वापर आणि सोशल मीडियाचे व्यसन इतके वाढत आहे की अल्पवयीन मुले-मुली सर्व मर्यादा ओलांडत आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत तीन अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने सतत मोबाईल फोन वापरल्याने वडिलांनी शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात घर सोडले. घरातून बाहेर पडताना तरुणीने दोन मैत्रिणींनाही सोबत घेतले. तिन्ही मुली 7 व्या वर्गात शिकतात. तिन्ही मुली 14 वर्षांच्या आहेत. तीन मुली घरातून पळून गेल्याच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली.
मुंबई पोलिसांना चार तासांत मुली सापडल्या
मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तपासासाठी स्वतंत्र पथके तयार करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे मुली अंधेरीहून दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेल्याचा सुगावा लागला. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी अवघ्या चार तासांत मुलींचा शोध घेतला. एमआयडीसी पोलिसांनी या मुलींना दादर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. घरातून पळून गेलेल्या मुलींच्या पालकांनी अवघ्या चार तासांत मुली शोधून काढल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.
इतर महत्वाच्या बातम्या