पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या (Accident News) बातम्या समोर येत आहेत, अशातच पिंपरी चिंचवडच्या सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा भीषण अपघात (Accident News) परिसरातील सीसीटीव्हीत (CCTV) ही कैद झाला आहे. या घटनेमध्ये मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर मावशीला सुद्धा चांगलाच मार लागला आहे. मोशीच्या प्रिस्टीन ग्रीन सोसायटीत हा अपघात (Accident News) 16 जानेवारीला झाला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नाही. 


या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ (Accident News) समोर आला आहे, त्यामध्ये पाहिल्यानंतर या अपघातामध्ये कार चालकाची चूक आहे, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही. मात्र, जखमी मुलाच्या वडिलांनी यात माझ्याच मुलाची चूक आहे, तोच गाडीच्या समोर धावत आला, असं त्यांनी पोलिसांना लिहून दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कदाचित मुलाच्या वडिलांवर दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पोलिसांना हा अपघात गंभीर वाटू नये, ही खरी शोकांतिका आहे. पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही? हा खरा प्रश्न उपस्थित होतो आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं यातून पुन्हा एकदा सिद्ध होतं, त्याचबरोबर या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 


सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय?


या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लहान मुलगा आणि त्याची मावशी एका बाजुने जाताना दिसतात, तर समोरील बाजुने कार सरळ येता येता तिरकी होते आणि त्या दोघांच्या अंगावरती जाते, घटना घडताच आजुबाजुचे सर्वजण त्या ठिकाणी जमा होतात, हे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते.


कार चालवताना एक चूक झाली अन्… 


पुण्यात आणखी एका घटनेमध्ये कार चालवताना चालकाची एक छोटी चूक झाली आणि कार थेट दुसऱ्या मजल्याच्या पार्किंगमधून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली. ही घटना विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही. घटनेचे CCTV फुटेज आता समोर आले आहे.  एका छोट्याशा चुकीमुळे या व्यक्तीचा जीव जाऊ शकला असता, सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.