पुणे: पुण्यातील हिंजवडी येथील इन्फोसिसमधील तरुणीच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता त्याच भागातील टाटा कंसल्टेन्सी सर्विसेस (टीसीएस) मध्ये काम करणाऱ्या एका 23 वर्षीय आयटी इंजिनिअरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, आयटी पार्कमधील अपार्टमेंटमध्ये अभिषेक कुमार हा राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरचा असणारा अभिषेक हा टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तिथून जवळच असलेल्या आयटी हबमधील फेज 3 मध्ये असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये तो काही रुममेट्ससोबत राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि त्याचे रुममेट हे त्याच अपार्टमेंटमध्ये होते.  त्यावेळी अभिषेक त्यांना म्हणाला की, 'मला झोपायचं आहे, मी बेडरुममध्ये जाऊन झोपतो.' असं म्हणत त्यानं बेडरुम आतून बंद करुन घेतला. त्यानंतर काही वेळानं अभिषेकच्या एका मित्राचा त्याच्या रुममेटना फोन आला. त्यावेळी त्याने सांगितलं की, अभिषेकनं आत्महत्या केली आहे. या फोननंतर त्याच्या रुममेटने थेट बेडरुमकडे धाव घेतली. त्यावेळी अभिषेक त्यांना लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी थेट त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.

पोलिसांच्या मते, आत्महत्या करण्यापूर्वी अभिषेकनं आपल्या मित्राला फोटो किंवा मेसेज पाठवला असण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाबाबत पोलीस म्हणाले की, 'आम्हाला अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पण प्राथमिक चौकशीत असं आढळून आलं आहे की, अभिषेकचं एका मुलीसोबत ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. दरम्यान, आम्ही त्याच्या रुममेट्सचा जबाबही नोंदवणार असून अभिषेक आणि त्यांचे मोबाइल फोनही तपासणार आहोत.'

संंबंधित बातम्या:

इन्फोसिसमधील तरुणीच्या हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?

हिंजवडीत महिला आयटी इंजिनिअरची हत्या, सुरक्षारक्षक ताब्यात

रसिलाच्या हत्येमागे वरिष्ठांचा हात असू शकतो : वडिलांचा दावा

‘एक टक का बघतोस,’ जाब विचारल्याने इन्फोसिसच्या इंजिनिअरची हत्या