Deenanath Mangeshkar Hospital: 'कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा, आमची मान शरमेने...', रूग्णालयाच्या ट्रस्टींनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
Deenanath Mangeshkar Hospital trustees: इथून पुढे कोणत्याही इमर्जन्सी रुग्णाकडून कुठलीही अनामत रक्कम जमा करुन घेतली जाणार नाही, असा निर्णय दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे ट्रस्टी डॉ. केळकर यांनी पत्र जारी करत जाहीर केला आहे.

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) हलगर्जीमुळे गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांपासून ते सर्व राजकीय नेत्यांनी घेतली. दीनानाथ रुग्णालयाबाहेर राजकीय पक्षांनी कालपासून आंदोलने सुरू केली. रूग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) नावाला काळं फासलं. अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली गेली. या सर्व घडामोडीनंतर प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करत अहवालही सादर केला आहे. अशातच वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे इमर्जन्सी रुग्णाकडून कुठलीही अनामत रक्कम जमा करुन घेतली जाणार नाही, असा निर्णय आता रूग्णालयाचे ट्रस्टी डॉ. केळकर यांनी एक पत्रक जारी करत जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांनी कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता असंही म्हटलं आहे. (Deenanath Mangeshkar Hospital)
हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली...
कालचा दिवस दीनानाथ च्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे. हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन, आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले.
दुर्दैवी घटनेमागे रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे
हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला -'असंवेदनशीलता' अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले.
इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही
जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.























