पुणे: पुण्यात प्रसूतीदरम्यान तनिषा भिसे यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र दोन्ही नवजात बाळांचे वजन अत्यल्प असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष निगा राखण्यात येत आहे. या बाळांच्या उपचारासाठी 24 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून देण्यात आलेली ही मदत ही रुग्णालयाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे. यापुढे देखील पुढील उपचारांसाठी आणखी आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्चही कक्षातूनच केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये पैशांअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसेंचा मृत्यू झालाचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्या नंतर अनेक संस्था, संघटना, पक्षांनी रूग्णालयांसमोर आंदोलने केली. या प्रकरणात समित्या स्थापन केल्या. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिसे कुटुंबीयांची तात्काळ भेट घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी दोषींवर कारवाई करू असंही त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर मदतीचं आश्वासन देखील दिलं होतं, काल (शुक्रवारी, 2मे) संबंधित रुग्णालयात मदतीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उपचाराकरिता एका बाळासाठी 10 लाख, तर दुसऱ्या बाळासाठी 14 लाख रुपये मदत म्हणून दिली गेली आहे. सध्या दोन्ही बाळांचे उपचार सूर्या हॉस्पिटल, पुणे येथे सुरूअसून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले.

मृत्यू प्रकरणात काय काय घडलं?

- गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांना 28 मार्चला दीनानाथ रुग्णालयात नेण्यात आलं होतं.- दीनानाथमध्ये उपचार मिळाले नाहीत म्हणूल आधी ससून आणि नंतर पुण्यातील वाकडमधील सुर्या रुग्णालयात नेण्यात आलं. - 29 मार्चला सकाळी नऊ वाजता तनिषा भिसे यांची प्रसुती झाली. त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. -29,30 मार्चला सुर्या हॉस्पिटलमध्ये त्यांना रक्तस्त्राव सुरु झाला आणि त्यांची तब्येत खालावली. -31 मार्चला तनिषा भिसे यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. - 3 एप्रिलला हे सगळं प्रकरण समोर आलं. - 4 आणि 5 एप्रिलला दीनानाथ रुग्णालयासमोर 25 हून अधिक पक्ष आणि संस्थांनी आंदोलनं केली. निदर्शनं केली. - दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. पालेकर यांनी या सगळ्यांचे निवेदनं स्विकारली. पालेकर यांच्यावर चिल्लारदेखील फेकण्यात आले. - याच दरम्यान तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या. - राज्यशासनाची समिती, धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती आणि सोबतच माता मृत्यू अन्वेषण समिती अशा तीन समित्या स्थापन केल्या आणि या प्रकरणाची माहिती घेऊन अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आलं. -7 मार्चला पहिला अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल राज्यशासनाचा अहवाल होता. यात दीनानाथ रुग्णालय दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सोबतच राज्यशासनाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन हा अहवाल सादर केला होता. या समितीत खालील डॉक्टरांचा समावेश होता.