Pune : मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी (Talegaon MIDC) परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅस गळतीची गंभीर घटना घडली आहे. यामध्ये दोन कामागारांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला गॅस सिलेंडर स्फोटाची माहिती समोर आली होती, मात्र प्राथमिक माहितीनुसार कंपनीत CO₂ गॅस गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तळेगाव एमआयडीसी परिसरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू असून परिसरात आवश्यक खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. या घटनेमुळे तळेगाव एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
प्रसूतीनंतर 3 दिवसांनी आयसीयूमध्ये भरती असलेल्या एका नवजात बालिकेचा मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा आरोप
नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील नामांकित देवकी हॉस्पिटल मध्ये प्रसूतीनंतर 3 दिवसांनी आयसीयूमध्ये भरती असलेल्या एका नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पहाटेपर्यंत नवजात बालिका ठीक असताना अचानक सकाळी तीचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर आयसीयू मध्ये देखरेख करणाऱ्या परिचरिकांनी व डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा आरोप नवजात बालिकेच्या वडिलांनी केला आहे. त्यावर काय उपचार केले व तेथील सीसीटीव्ही फुटेज देण्यास हॉस्पिटल प्रशासनाने विलंब केला. शिवय फाईलमध्ये काही खाडाखोड केल्याचा गंभीर आरोप मोईन तांबोळी या नवजात बालिकेच्या वडिलांनी केला आहे.