पुणे : पुण्यामध्ये स्वाईन फ्लूनं थैमान घातल्याचं चित्र आहे. स्वाईन फ्लूच्या लागणीमुळं पुण्यात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात पुण्याच्या विविध परिसरात एका चिमुरडीसह 3 व्यक्तींचा मृत्यू झाला. या सर्वांचे वैद्यकीय अहवाल काल आले, यामध्ये या चौघांनाही स्वाईन फ्लूचीच लागण झाल्याचं समोर आलं आहे.


पुण्यात आतापर्यंत एकूण 24 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला असून, यामध्ये  महापालिका क्षेत्रातील 8, तर पुण्याच्या इतर भागात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं प्रशासनानं यावर त्वरित उपाययोजना करणं गरजेचं बनलं आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडूनही शहरात याआधीच स्वाईन फ्लू विरोधी हाय अलर्ट जाहीर केला आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या 105 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. तर काल हाती आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 24 रुग्णांना स्वाईन फ्लूमुळे आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे.

सध्या तापमानाचा पाराही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं, आवाहन महापालिकेच्या मुख्य आरोग्य विभागानं केलं आहे.

संबंधित बातम्या

पुण्यात स्वाईन फ्लूबाबत महापालिकेकडून हाय अलर्ट