Supriya Sule Pune traffic News:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्याकडे पुणेकरांसाठी खास मागणी केली आहे.  पुणेकरांच्या वाहतूक समस्येवर भाष्य केलं आहे  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गानंतर आता पुणे-सातारा महामार्गावर नागरीकांना येणाऱ्या वाहतूक कोंडीसारख्या समस्यांवर तोडगा काढा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे.


ट्विटमध्ये त्यांनी काय लिहिलंय?
पुणे-सातारा महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे.हा महामार्ग नागरी भागातून जातो.महामार्गापासून नागरी भागांना जोडणाऱ्या सर्व्हीस रोडची अवस्था देखील अनेक ठिकाणी दयनीय आहे.यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीचा देखील सामना नागरीकांना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास वाहनचालक तसेच परिसरात राहणाऱ्या नागरीकांना देखील सहन करावा लागतो आहे. याबाबत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीनजी गडकरी,आपणास नम्र विनंती आहे की, या समस्यांवर तोडगा काढणे तसेच पुणे-सातारा महामार्गावर सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी आपण संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावे, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.



यापुर्वी त्यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या वाहतुकीमुळे ध्वनीप्रदुषण होते. या प्रदुषणाचा अनेक नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे नागरिकांना या त्रासापासून मुक्त करण्यासाठी पुण्यातील महामार्गावर वाकड ते नर्हे या मार्गावर साऊंडप्रुफ वॉल/बॅरियर उभारावेत, अशी मागणी पुण्यातील अनेक संस्थांकडून होत होती. यांच्या ध्वनीप्रदुषणाच्या प्रश्नाकडे किंवा त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली होती . सुप्रिया सुळे यांनी एक पत्र  ट्विट करत याबाबत माहिती दिली होती.


शहरातील वाहतूक कोंडीवर त्या अनेकवेळा भाष्य करतात. विविध प्रश्नांवर बोलत असतात. यावेळी मात्र त्यांनी पुण्याच्या रस्त्याचं गाऱ्हाणं थेट नितिन गडकरी यांच्याकडे मांडलं आहे. पुण्यात मेट्रोचं काम सुरु असल्याने अनेक परिसरात वाहतूक कोंडी होते. या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने रोडवर खड्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे. याबाबत अनेकदा पुणेकरांनी तक्रारी दिल्या होत्या मात्र आता सुप्रिया सुळेंनी आवाज उठवल्यावर रस्ते नीट होणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.