पुणे : मोक्का (Mcoca Act) लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीत केलं. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावरच आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी मोक्का लागण्यापासून एखाद्याला वाचवलं असेल तर हे धक्कादायक आहे. याचं सरकारने उत्तर द्यायला हवं, असं त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमकं कोणाला वाचवलं?, कोणत्या केसमधून वाचवलं?,आणि एवढ्या मोठ्या मोक्कामधून वाचवण्याची कारणं कोणती होती? याची माहिती द्यायला हवी आणि सोबतच सरकारनेदेखील याचं उत्तर द्यायला हवं.
सुप्रीम कोर्टाची मी आभारी!
निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहेत? असा सवाल केला. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचं सुप्रिया सुळेंनी आभार मानले. त्यासोबतच शरद पवारांना सोडून गेल्यानंतर फोटो का वापरायचा?,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. इलेक्ट्रोरल बॉण्ड कोणी दिले, ते कोणत्या पक्षाला दिले शिवाय कोणाला मिळाले, यासंदर्भात सगळी माहिती मिळायला हवी. त्यासोबतच इलेक्ट्रोरल बॉण्डची श्वेतपत्रिका काढायला हवी, असं देखील त्या म्हणाल्या.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
आता बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही दादा तुम्ही एवढ कडक वागतात आणि अशा गोष्टीला कस पाठीशी घालतात? तेव्हा माझापण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते, असं अजित पवार बारामतीत म्हणाले होते.
इतर महत्वाची बातमी-