Supriya Sule On Maharashtra Political Crisis: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे काल दर्शन घेतल्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे या संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी यवत या ठिकाणी आल्या होत्या आणि यावेळी त्यांनी शिवसेनेतून गुवाहाटीत गेलेल्या आमदारांचा पळकुटे आणि भगोडे असा उल्लेख करून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. 


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून आपली स्वतःची शिवसेना बाळासाहेब ठाकरे असा पक्ष काढला असून यावर सुप्रिया सुळे यांनी आपले पहिली प्रतिक्रिया दिली आहे .माणुस कर्तुत्वाने मोठा होत असतो नावाने नाही असं म्हणत बाळासाहेबांनी शिवसेनेच्या उत्तराधिकारी केव्हाच ठरवला होता आणि त्यांच्या नंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि चालावी अशी त्यांची इच्छा होती, असं त्या म्हणाल्या.


आपल्या मतदार संघात विकास काम करण्यासाठी लोक आपल्याला निवडून देतात त्यामुळे आमदारांना बंड करायचा असेल तर आपल्या मातीत बंड करावा पळून जाऊन इतर राज्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून बंड करणं हे हास्यास्पद आहे. गुवाहाटीला जाणाऱ्या या सर्व आमदारांना सुप्रिया सुळे यांनी भगोडे म्हणत टीका केली आहे.


इतर राज्यात जाऊन पंचतारांकित राहणारे आमदार हे पर्यटक नसून लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील काम गेल्या आठ दिवसापासून खोळंबली आहेत. गुवाहाटीला जे आमदार शिवसेना सोडून गेले आहेत त्यामागे भाजपचा हात आहे का? असे विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मात्र या वेळी बोलणं टाळलं आहे. 
मतदारसंघातील कामे आठ दिवस खोळंबली असल्याने सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


आमदारांना पैसे कोण पुरवतंय?


एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणात एकच भूकंप झाला आहे. चाळीसहून अधिक आमदारांचे  समर्थन शिंदे यांना असल्याने शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळतो आहे. मात्र याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या आमदारांचा हॉटेलवर होणारा खर्च देखील चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हा सगळा कोट्यवधीचा खर्च कोण पुरवतंय?, याबाबत इन्कम टॅक्स आणि ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलंय.