काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही पूर्वसूचना नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिली.

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या कामाची स्टाईल, कामाचा धडाका आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड महाराष्ट्राला परिचित होती. कामचुकारपणा, बेशिस्तपणा आणि अस्वच्छता ते कदापि खपवून घेत नसतं. त्यामुळेच, बारामतीमध्ये (Baramati) अगदी सकाळी सकाळीसुद्धा सर्वकाही शिस्तबद्ध आणि स्वच्छ असायचं. येथील शासकीय संस्थेत एक शिस्त होती, अजित पवारांचा दरारा होता. आता, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) कार्यपद्धतीत अजित दादांची स्टाईल पाहायला मिळाली. सुनेत्रा पवारांनी महिला कर्मचाऱ्यांना चांगलाच दम भरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही पूर्वसूचना नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छतेची स्थिती, औषधांचा पुरवठा तसेच एकूण व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत जबाबदारीने व तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही दिल्या.
महिला कर्मचाऱ्यांना झापलं
रुग्णालयाची पाहणी करताना सुनेत्रा पवारांना काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आली, त्यावेळी तेथील कर्मचारी महिलांना त्यांनी चांगलच झापलं. ही काय घाण आहे, इथं उशी पडलेली दिसतेय. काय करता दिवसभर, फक्त मोबाईल बघता का? अशा शब्दात सुनेत्रा पवारांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच, येथील डॉक्टरांसह अधिकाऱ्यांनाही दम भरला. रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले.
सुनेत्रा पवारांची अजित दादा स्टाईल
ही केवळ औपचारिक भेट नव्हती, तर लोकांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता आणि प्रशासनावर असलेली बारीक नजर याचे प्रत्यंतर देणारी कृती होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम सुनेत्रावहिनी करत असल्याचे या भेटीतून पुन्हा एकदा दिसून आले. जनतेच्या प्रश्नांबाबतची तत्परता, कामातील शिस्त आणि प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याची पद्धत यामुळे आज अनेकांना त्यांच्यामध्ये अजितदादांचे प्रतिबिंब दिसत आहे. आगामी काळात बारामतीच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक आणि लोकाभिमुख बदल घडवून आणण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
हेही वाचा
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा























