पुणे : प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आणि साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 99 वर्षाचे होते. दादा वासवानी यांनी आज सकाळी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
सिंधी समाजाचे धार्मिक गुरु अशी दादा वासवानी यांची ओळख होती. दादा वासवानी यांचं पूर्ण नाव जशन पहलराज वासवानी होतं. 2 ऑगस्ट 1918 रोजी हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. वासवानी मिशनची स्थापना त्यांचे गुरु साधू टी एल वासवानी यांनी केली होती. वासवानी मिशनचं मुख्यालय पुण्यात असून देशभरात त्याची केंद्र अनेक आहेत.
दादा वासवानी यांनी आयुष्यभर शाकाहाराचा प्रचार-प्रसार केला आणि प्राण्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी चळवळ उभी केली होती. त्यांनी अध्यात्मावर एकूण 15 पुस्तके लिहिली आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेला त्यांनी संबोधित केलं होतं.
दादा वासवानी यांच्या 99 व्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, तसंच त्यांच्याबद्दल गौरोद्गार काढले होते. 27 वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक धार्मिक संमेलनात माझी आणि दादा वासवानी यांची भेट झाल्याचं मोदींनी म्हटलं होतं.