पिंपरी चिंचवड : प्रभागात डुकरांचा सुळसुळाट आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे त्याकडील दुर्लक्ष, याचा निषेध करताना शिवसेना नगरसेवकाकडून डुकराच्या पिल्लूचे चांगलेच हाल झाले. वकिलीची पदवी घेतलेले नगरसेवक सचिन भोसले यांनी बंद बॅगेत एक डुकराचे पिल्लू आणलं होतं. बॅग घेऊन ते महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसले.
पिल्लू देताना बॅग तशीच द्यावी, अशी विनंती मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी केली होती. मात्र तरीही सचिन भोसले यांनी बॅगेची चेन उघडून पिल्लू बाहेर काढलं, तेव्हा पिल्लूचे पाय बांधल्याचं दिसलं. बरं पिल्लूचे हाल इथेच थांबले नाहीत, तर बांधलेले पाय सोडण्यासाठी भोसलेंनी छोटं कटर बाहेर काढलं. मग भोसले यांना रोखताना सुरक्षारक्षकांसोबत त्यांची झटापटही झाली.
महापालिकेत पिल्लू सोडण्याचा डाव फसू लागल्याने, सचिन भोसलेंच्या कार्यकर्त्याने टेबलावरुन डुकराच्या पिल्लूला अक्षरशः खाली ढकलून दिले. शेवटी सुरक्षारक्षकांनी पिल्लूला उचलून बाहेर नेले. परंतु डुकरांच्या सुळसुळाटाचा निषेध नोंदवताना नगरसेवकाने पिल्लूचे मात्र प्रचंड हाल केले.