बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचेही अंजली दमानियांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही यावेळी अंजली दमानियांनी उपस्थित केला होता. दमानियांच्या या गंभीर आरोपांवरती शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात. तुमच्याकडे महिती असेल तर पोलिसांना द्या. हत्या झाली तर त्यांचे मृतदेह कुठं आहेत. सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे, बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळं बिघडत चाललं आहे. आरोपींना तातडीने अटक केलं जाईल, 6 एजन्सी शोध घेत आहेत, आरोपींवर कारवाई करताना कुणाचीही गय केली जाणार नाही, असंही पुढे शिरसाट म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
‘काल रात्री मला 11.30 वाजण्याच्या दरम्यान फोन आला. मला व्हॉट्सअप कॉलवर या सांगितलं. फोन लागला नाही. त्यांनी मला व्हॉइस मेल पाठवले. त्याने सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लोक कधीच भेटणार नाहीत. ते मेले. तीन प्रेते सापडली. ती जागाही कॉल केलेल्यांने सांगितली. हे खरं खोटं मला माहीती नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचे मर्डर झाले आहे.’ अशी माहिती अंजली दमानिया यांनी बीडमध्ये दिली आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचही अंजली दमानियांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थिती केला आहे.
बीडमध्ये मुक मोर्चाला लोटला जनसागर
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती उतरला आहे. बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर आले आहेत, बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती. हातात न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चात सामील झाल्या आहेत. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये कडकडीत बंद आहे. अख्खं गाव बीड मोर्चामध्ये सहभागी झालं असल्याने गावकरी बीडमध्ये पोहचले आहेत. गावात शुकशुकाट आहे.