Shetkari Sanghatana : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरुन शेतकरी संघटना (Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिवशीच (2 ऑक्टोबर) शेतकरी संघटनेच्या वतीनं कांदा आणि ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर (Otur) या ठिकाणी ही परिषद होणार आहे. या परिषदेला शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath Dada Patil ) हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता या परिषदेला सुरुवात दोणार आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या?
- कांद्यावरील निर्यातबंदी कायमची उठवली पाहिजे
- स्वामिनाथन आयोगाप्रमाणं कांद्याला 30 रुपये भाव मिळाला पाहिजे
- दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द झाली पाहिजे
- सी. रंगरंजन समिती प्रमाणं शेतकऱ्यांना 70/30 टक्के प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळावेत
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होऊन 7/12 कोरा झाला पाहिजे
- जुन्नर तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर झाला पाहिजे
या प्रमुख मागण्यांसाठी आज ओतूरला कांदा आणि ऊस परिषद आयोजीत करण्यात आली आहे. या परिषदेला मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे. जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसमोर विविध अडचणी
सध्या राज्यातील शेतकरी विविध अडचणींचा सामना करत आहे. शेतकऱ्यांना कायमच तोटा सहन करावा लागत आहे. उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पन्न याचा मेळ बसत नाही, त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना शेत मालाला मिळणार दर मात्र, त्या पटीत वाढत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत असल्याचे शेतकरी संघटेनं म्हटलं आहे.
दरम्यान, यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं काही ठिकाणी वाहून गेली आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. मोठं नुकसान झालं आहे. तसेच अतिवृष्टीनंतर काही भागात कापूस आणि सोयाबीन पिकांवर रोगांचा देखील प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अशा विविध संकटाचा सामना सध्या शेतकरी करत आहेत. त्यामुळं या शेती प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस आणि कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: