पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Pune Deenanath Mangeshkar Hospital) हलगर्जीमुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला झाला असल्याचा दावा भिसेंच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत सुरु आहे. त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. अशातच तनिषा भिसे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष जगताप यांनी दिली आहे. 

प्रशांत जगताप तनिषा भिसे प्रकरणी बोलताना म्हणाले की, तनिषा भिसे प्रकरणाच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी कुटुंबाला शब्द दिला होता की, कारवाई करू. मात्र, अजूनही कारवाई ही झालेली नाही. आमच्या पक्षाच्या वतीने येणाऱ्या गुरुवारी 24 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार आहोत. ज्यात ससूनला देखील पार्टी करण्यात येणार आहे. दीनानाथ रुग्णालयाच्या बरोबर ससूनचे डीन आणि अधीक्षक यांना सहआरोपी करावं यासाठी याचिका दाखल करणार आहोत.

काय म्हणाले प्रशांत जगताप?

भाजपा आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, एक प्रकारे तनिषा भिसे यांचा दीनानाथ रुग्णालयाने खूनच केला अशी परिस्थिती समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या वेगवेगळ्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचे चित्र समोर आलं होतं.  माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकूणच सगळे केस पेपर पाहिल्यानंतर, होय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाशी संबंधित डॉक्टर सुश्रुत घैसास आणि त्यांची एकूणच टीम दोषी आहे हे सत्य समोर आलं. पण, त्यानंतर आता पुण्यातील ज्या पोर्शे कार अपघात प्रकरण त्यातील रक्ताचे नमुने बदलले त्या रुग्णालयात आलेल्या अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयाला निर्दोष सोडण्यात आले आहे.

त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि स्वतः उपमुख्यमंत्री यांनी कुटुंबाला शब्द दिला होता, आम्ही त्या रुग्णालयावरती कारवाई करू. मात्र, कोणते पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आम्ही 24 एप्रिलला येणाऱ्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्याची याचिका आणि त्यामध्ये देखील ससूनला पार्टी करण्यात यावं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा, त्यांची सनद रद्द करावी. ही मागणी तर आहेच, मात्र पोर्शे कार अपघात प्रकरणापासून ललित पाटील किंवा आता दीनानाथ मंगेशकर प्रकरण असेल याबाबत ससूनचे डीन आणि एकूणच संबंधित आणि इतर जे यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करणार आहे. त्याचबरोबर जो माणूसकीचा अंत झाला आहे, त्याच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे आणि हा लढा आमचा चालू राहणार असल्याचा देखील प्रशांत जगताप यांनी सांगितला आहे.