नवी दिल्ली : अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आम्हाला दुःख आहे, त्यामुळे पवार कुटुंबप्रमुख म्हणून बारामतीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं. काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे असंही शरद पवार म्हणाले. तसेच काँग्रेस पक्षावर वक्तव्य करण्याइतपत परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही असंही शरद पवार म्हणाले. 

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला. शरद पवारांच्या पक्षाकडून बारामतीमध्ये उमेदवार देण्यात आला नाही. परंतु महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र त्यांच्या उमेदवार उभा केला आहे. या सगळ्यांवर शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar On Baramati Election : कुटुंबप्रमुख म्हणून निर्णय

शरद पवार म्हणाले की, "कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर समोर कुणीतरी असेल हे मान्य करुनच लढवावी लागते. आम्ही उमेदवार उभा केला नाही. अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात. अजित पवार अकाली गेले त्याचं दुःख म्हणून कुटुंब म्हणून आम्हाला आहे. पवारांमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्याला लढवायची नाही असं आम्ही ठरवलं. या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभा केला नाही."

राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी माघार का घेतली याची माहिती नाही. माझ्या पक्षाने सांगितलं की तनपुरे लढणार नसतील तर स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. त्यानंतर गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी देण्यात आली असं शरद पवार म्हणाले. 

उमेदवार देण्याचा काँग्रेसचा अधिकार

बारामतीमध्ये उमेदवार देणं हा काँग्रेसचा अधिकार आहे, परिस्थिती पाहून काँग्रेसने निर्णय घेतला असेल असं शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून एकत्र असताना एखाद्या मतदारसंघात अशा काही अडचणी येतात, तो काही राष्ट्रीय विषय नाही. 

राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, राजकारणामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागले. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा ही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये झाली होती. त्यावेळी अजित पवारांचा आग्रहा हा वेगळा होता. आता ते राहिलेले नाहीत. त्यामुळे आमच्या पक्षात आता विलिनीकरणाची चर्चा केली जात नाही, असं शरद पवार म्हणाले.