पुणे: पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची (व्हीएसआय) काल (गुरूवारी, 23) वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्याचेवळी चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar) , जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर एकाच व्यासपिठावर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची आसन व्यवस्था शेजारी-शेजारी करण्यात आली होती. मात्र, सभा सुरू होण्यापूर्वी अगोदर अजित पवार हे व्यासपीठावर आले आणि त्यांच्या शेजारी-शेजारी बैठक व्यवस्था आणि नावाची पाटील असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती व्यवस्था बदलली. त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसण्याचे टाळले. यावर आज पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शरद पवार
आज कोल्हापुरात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी शेजारी बसणं टाळलं का? यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विनंती केली दोन तीन गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत, त्यामुळे ते माझ्या शेजारी बसले. नवीन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत त्यांना माझ्याशी बोलायचं होत मीच म्हटलं मग माझ्या बाजूला बसा, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
सभा सुरू होण्यापूर्वी अगोदर अजित पवार हे व्यासपीठावर आले आणि त्यांच्या शेजारी-शेजारी बैठक व्यवस्था आणि नावाची पाटील असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती व्यवस्था बदलली. त्याचबरोबर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांच्या खुर्चीवर अजित पवार यांच्या नावाचा फलक दिसला. ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांना काही बोलण्यासाठी बोलून घेतले आणि तो फलकही त्यांनी स्वतःच्या हाताने खुर्चीच्या मागे ठेवल्याचं दिसून आलं.
अजित पवारांनी का शेजारी बसलो नाही त्यावर दिलं उत्तर
सभेनंतर अजित पवार यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्या वेळी शेजारी-शेजारी बसणे टाळल्याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे पहिल्यांदाच सहकारमंत्री झाले असून, त्यांना शरद पवार यांच्याशी बोलायचे होते. म्हणून त्यांना शेजारची खुर्ची दिली. माझा आवाज हा दोन तीन खुर्चा ओलांडून दूर जाऊ शकतो. म्हणून मी दूर बसलो. व्हीएसआयच्या गेल्या दोन वर्षांतील बैठकांना येण्याचं त्यांनी टाळलं का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, तेव्हा मी फार कामात होतो. माझे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याचा विचार करत होतो, असे त्यांनी मिश्किलपणे म्हटलं आणि एकच हशा पिकला.
शरद पवार यांच्या केबिनमध्येही नेत्यांची चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर व्हीएसआयमध्ये आले होते. ते थेट संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या केबिनमध्ये गेले. सुमारे अर्धा तास ते केबिनमध्येच होते. या वेळी त्यांच्या गटाचे नेते आमदार दिलीप वळसे पाटीलही यावेळी उपस्थित होते. त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, साखर उद्योग, इथेनॉल, साखर कारखानदारीचे प्रश्न यांच्यासह राज्य सरकारशी संबंधित ऊर्जा, कृषी, उत्पादन शुल्क आणि सहकार या खात्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यावर चर्चा झाली. तसेच व्हीएसआय संस्थेची विस्तार वाढ, नवे प्रकल्पांवर चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.