पुणे: ऐन गणेशोत्सवात पिंपरी- चिंचवडमध्ये तीन दिवसांत दुसरी हत्या झाली आहे. आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या करून, तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना काल रात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान घडली असून, सकाळी ती उघडकीस आली आहे. शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके उडाले होते, त्यानंतर रिक्षाचालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेम संबंध जुळले. 


गेली दोन वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आळवून हत्या केली. मग, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आणि तो पसार झाला. काहींना आज सकाळी रिक्षात शिवानी बसल्याचं दिसलं, पुढं ती मृत पावल्याचं लक्षात आलं. वाकड पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे. ही हत्या प्रियकर विनायकने केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेली आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दोन दिवसांपूर्वी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच अली अन्सारीची दगडाने ठेचून हत्या झाली होती. आता या महिलेचा गळा घोटण्यात आला. त्यामुळं ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


'X' च्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस आयुक्तांना रस?


पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडी नित्याची झालेली असतानाच आता पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये हत्या सत्र सुरू होतंय की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण ऐन गणेशोत्सवात तीन दिवसांतच दोन हत्या झाल्यात. तसेच गणपतीची प्रतिष्ठापना झाली तेव्हापासून अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी काही गुन्ह्यांमुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


यात वाकडमध्येच दोघांनी एकाच्या हत्येचा प्रयत्न केला, रावेतमध्ये जीवे मारण्याच्या उद्देशाने आठ जणांनी एकास बेदम मारहाण केली, तळेगाव आणि चाकणमध्ये जीवंत काडतुसे यांसह बंदूक बाळगणारे आढळले तसेच हिंजवडीत अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचं ही उजेडात आलं आहे. अशा प्रसंगी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंनी प्रत्यक्षात समाजात वावरणं आणि छोट्या-मोठ्या उगवत्या गुंडांना चाप लावण्याची, त्यांच्यात वचक निर्माण करण्याची गरज आहे. असं असताना पोलीस आयुक्तांनी 'X' या सोशल मीडियावरून व्हर्च्युअली संवाद साधत, जनतेच्या समस्या सोडविण्याचा विडा हाती घेतला आहे. 


एका अर्थाने या उपक्रमाचे कौतुक करायला हरकत नाही. कारण व्हर्च्युअली का होईना, पोलीस आयुक्तांशी सामान्य नागरिकांना थेट संवाद साधता येतो आहे. पण या उपक्रमामुळं शहरात घडणाऱ्या हत्या, हत्येचे प्रयत्न कसे रोखता येणार? अवैद्य शस्त्र साठा आणि अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना चाप कसा बसवता येणार? गर्दीचा फायदा घेत चोऱ्या-माऱ्या करणाऱ्यांवर वचक कसा बसवता येणार. अन सर्वात महत्वाचं म्हणजे शहर वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून स्वतःच्याचं वाहतूक पोलिसांना मुख्य चौकात उभं करण्याची जबाबदारी कोण घेणार? या सगळ्या प्रश्नांची शहर वासीयांना हवी असणारी उत्तरं पोलीस आयुक्त व्हर्च्युअलीचं देणार? की शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते प्रत्यक्षात समाजात उतरणार? यावर बरंच काही अवलंबून आहे.