पुणे: माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात 35 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. जानेवारीमध्येच त्या आल्या, पण तीन महिन्यांहून अधिक काळ पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेत त्या धुळखात उभ्या आहेत. काहींच्या चाकातील तर हवा गेली आहे, तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या आहेत. यामुळे आता माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील खरेदीचा गोंधळ समोर आला आहे. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना या शववाहिका देण्यात येणार होत्या. मात्र, जानेवारी महिन्यापासून या शववाहिका धूळ खात पडून आहेत. एका शववाहिकेला साधारणता 36 लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. एवढ्या दिवसांपासून, महिन्यांपासून या सगळ्या शववाहिका वापराविना धुळखात पडून का आहेत?तत्कालीन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


नेमकं काय आहे कारण?


सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आवारामध्ये या सर्व शववाहिका धुळ खात पडलेल्या आहेत. जानेवारी महिन्यामध्ये या सर्व शववाहिका आलेल्या आहेत. या शववाहिका राज्यातील महापालिका, नगरपालिका या सर्व शववाहिका देणे अपेक्षित होतं. मात्र, अजूनपर्यंत या सर्व शववाहिका देण्यात आलेल्या नाहीत. या सर्व शववाहिका एसी बसवलेल्या आहेत. सर्व शववाहिकांची परिस्थिती सध्या वाईट आहेत. एका शववाहिकांची किंमत 36 लाखांपर्यंत आहे. सुरुवातीला यासाठी 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. जानेवारीच्या पहिल्या टप्प्यात 25 शववाहिका या ठिकाणी आणण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात 25 आणि फेब्रुवारी महिन्यात 50 अशा एकूण शंभर शववाहिका या ठिकाणी आणलेल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत यांचं वाटप करण्यात आलेलं नाही किंवा त्या-त्या विभागाला त्या सुपूर्त करण्यात आलेले नाहीत. मात्र, या आणण्यामागे जो हेतू होता, तो हेतू मात्र अपूर्ण राहिल्याच्या चर्चा आहेत. 


या शववाहिकांवरती प्रचंड अशी धूळ साचली आहे, काही पंचर झालेल्या अवस्थेत आहेत, तर काही नादुरुस्त होण्याच्या मार्गावरती आहेत, त्यामुळे आत्ता विद्यमान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर या संदर्भात काही निर्णय घेणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावेळी हे आरोग्य विभागाचं काम नसताना आरोग्य विभागाने या शववाहिका का मागवल्या यामागे नेमका हेतू काय होता, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे, अशी चर्चा आहे. या सर्व शववाहिका पुण्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आवारात धुळ खात पडून आहेत. यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.