पुणे : ससून रुग्णालयात अनेक महिन्यांपासून (Sasoon Hospital Drug Racket)  उपचार घेत असलेल्या कैद्यांवार आता चांगलाच "इलाज" होणार असल्याचं समजत आहे. पुढील 2 दिवसात अनेक कैद्यांची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात होण्याची शक्यता आहे. उपचारासाठी कैद्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज आहे का? याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून समिती तयार करण्यात येणार आहे. 


काही दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयातून चालणारं ड्रग्स रॅकेट समोर आलं होतं. कैद्यांकडून हे ड्रग्स रॅकेट चालवलं जात होतं. अनेक कैद्यांनी या ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये मुक्काम ठोकला होता. त्यामुळे आवश्यक नसलेल्या कैद्यांना अजिबात उपचारासाठी ससून रुग्णालयात ठेवण्यात येणार नाही. ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 7 कैद्यांची तपासणी  केली जाणार आहे. रुग्णाला परत कारागृहात पाठवण्याचा सर्वस्वी निर्णय उपचार देत असलेले डॉक्टर घेणार असल्याची माहिती आहे. 


पुण्यातील ससून रुग्णालय कैद्यांसाठीचं दुसरं घर बनलं आहे. कारण अनेक कैदी वेगवेगळ्या आजाराची कारणं देत या ससूनमध्ये तळ ठोकून असतात. त्यात या ललित पाटील सारखे कैदी ससूनला ड्रग्सचा अड्डा बनवतात. याच सगळ्याला आळा घालण्यासाठी आता कैद्यांची तपासणी करुन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. श्रीमंत कैदी या ससूनमध्ये तळ ठोकून आपले कामं करत असतात असं काही जणांच्या उदाहरणावरुन समोर येतं. 


हे आरोपी ससूनमध्ये तळ ठोकून....


राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले हे बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. मात्र गेल्या 130 दिवसांपासून त्यांचा मुक्काम पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये आहे . 


पुण्यातील रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाणा हा कॉसमॉस बॅंकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल अटकेत आहे. त्याच्यावर ईडीने देखील कारवाई केली होती. मात्र तो देखील गेल्या पन्नास दिवसांपासून ससूनमध्ये आहे.


हेमंत पाटील - खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यातील या आरोपीवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र तो देखील गेले 41दिवस  ससूनमध्ये राहत आहे. 


विरल सावला हा मटका किंग मागील 247 दिवस ससूनमध्ये तळ ठोकून आहे


पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा पुतण्या रुपेश मारणे हा देखील ससूनमध्ये 47 दिवस तळ ठोकून आहे . 


हरिदास साठे हा कुख्यात गुंड 72दिवस ससूनमध्ये राहत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Sasoon hospital drug racket : ललित पाटील कसा पळाला?, डॉक्टरांना लक्ष्मीदर्शन घडतंय का? ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर नेमकं काय म्हणाले?