Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुबुद्धी यावी तसंच पक्षावर आलेले संकट दूर व्हावं, यासाठी बारामतीत शिवसैनिकांनी संकट मोचन गणपतीला साकडे घातले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सिद्धी गणेश मंदिर गणपतीला महाअभिषेक करून शिवसेना वाचवण्यासाठी साकडे घातले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करून नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. 


शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यभरात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यांच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे. आमदारांना सोबत घेत बंड केल्याने शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यामुळे शिवसेनेवर संकटाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे तर काही शहरात शिवसैनिक पक्षावरील संकट टळण्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना फेसबुक लाईव्ह मार्फत भावनिक साद घातली होती. मात्र राज्याचं चित्र कायम आहे.  याच सगळ्यात आता अनेक शहरात शिवसैनिक देवाला साकडं घालताना दिसत आहे. 


पुण्यात देखील झाली महाआरती


शिवसेना पक्षावर सध्या संकटाचं वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेचं हे संकट टाळण्यासाठी पुण्यात शिवसैनिकांकडूम महाआरती करण्यात आली. पुण्यातील येरवडा परिसरात ही महाआरती करण्यात आली. नगर विकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीने शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. गेल्या चार दिवसांपासून अनेक आमदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता दूर व्हावी, यासाठी राज्यभरातून शिवसैनिक वेगवेगळ्या प्रकारे शक्तीप्रदर्शन करत आहेत. 


उद्धव ठाकरे जर नेत्यांना कार्यकर्त्यांना भेटत नाही, असं असेल तर त्या सगळ्या आमदारांनी थांबायला हवं होतं. गेले 35 वर्ष झाले आम्ही सेनेचं काम करतो. मात्र आम्ही कधीच मातोश्रीवर भेटायला गेलो नाही. तरीही आमची कामं कधीच अडली नाही. त्यामुळे आमदारांनी केलेलं हे कृत्य नीट नाही, असंही शिवसैनिक म्हणाले.