पुणे : गेली 40 वर्षे पुण्यातल्या भोर मतदारसंघावर थोपटे घराण्याचं वर्चस्व होतं. हे घराणं काँग्रेसशी एकनिष्ठ. काँग्रेसच्या तिकिटावर आधी अनंतराव थोपटे सहा वेळा तर त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे तीन वेळा आमदार झाले. पण आता संग्राम थोपटेंनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा मोठा निर्णय घेतला. येत्या 22 एप्रिलला संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पण इतकी वर्षे काँग्रेसची साथ दिल्यानंतर थोपटेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कोणती खदखद बोलून दाखवली? 

सलग तीन वेळा आमदार म्हणून विजयी झालो पण पक्षानं प्रत्येक वेळी मोठी संधी दिलीच नाही असा तक्रारीचा सूर आळवत पुण्याच्या भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे अखेर भाजपच्या गोटात सामील होणार आहेत. पण जाता जाता ही वेळ आपल्यावर काँग्रेसने कशी आणली याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. 

संग्राम थोपटेंच्या मनातील खदखद

संग्राम थोपटे म्हणाले की, "माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसने आणली. तीन वेळा निवडून आलो. 2019 ला वाटत नव्हतं सत्ता येईल. पण काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळाली. पुण्याला मंत्रीपद मिळेल त्यात मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. पण मंत्रिपद मिळाले नाही. नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद मिळेल वाटलं. पण तिथेही संधी मिळाली नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळेल वाटलं पण ते मिळाले नाही." 

गेली 40 वर्ष भोर विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असलेलं राजकीय घराणं म्हणजेच थोपटे घराणं. पण दोन दिवसांपूर्वीच थोपटे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर चांगल्या वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भोरमधलं राजकीय वातावरण काहीसं गढूळ झालं. काँग्रेसकडून सतत डावलण्यात आल्यानं ते नाराज होते. अखेर ही खदखद राजीनाम्याच्या रुपानं त्यांनी बाहेर काढली. 

दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पक्ष बदलावा लागेल, भाजपमध्ये जावं अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. येणाऱ्या 22 तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश होईल. 

 Sangram Thopate Political History : संग्राम थोपटेंची राजकीय कारकीर्द

  • संग्राम थोपटे हे माजी मंत्री अनंतराव थोपटेंचे पुत्र.
  • संग्राम थोपटेंना राजकीय वारसा वडिलांकडूनच मिळाला.
  • वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोरचे आमदार तर 14 वर्षे मंत्री होते.
  • पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसमधलं एक मोठं नाव म्हणून अनंतराव थोपटेंची ओळख होती.
  • त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन संग्राम थोपटे राजकारणात उतरले.
  • 2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीत उपसभापती झाले.
  • 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भोरमधून विधानसभा लढवली आणि ते आमदार झाले.
  • त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून आमदारकीची हॅटट्रिक केली.
  • पण 2024 मध्ये राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकरांनी संग्राम थोपटेंचा पराभव केला.

खरं तर थोपटेंच्या नारीजीची सुरुवात ही 2019 पासूनच झाली होती. विधानसभेवेळी फॉर्म भरताना थोपटेंनी पक्षश्रेष्ठींना बोलावलं. मात्र कुणीही वेळ दिला नसल्याचं थोपटेंनी म्हटलं होतं. सत्ता असतानाही केंद्र आणि राज्याकडून आपल्याला निधी मिळाला नसल्याचंही थोपटेंनी बोलून दाखवलं. 

संग्राम थोपटे म्हणाले की, "फॉर्म भरायला पक्षश्रेष्ठींना बोलावलं, कुणी वेळ दिला नाही. मी पडल्यावर पण मला फोन केला नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आश्वासक चेहरा नाही. अनेक प्रकल्प आहेत पण केंद्र, राज्य सरकारकडून त्याला निधी नाही. त्याला अनेकदा कात्री लागली. सत्ता असताना काही कामे झाली नाहीत. मुळशी तालुक्यात लोकसभेला मतदान झालं, ते विधानसभा ला मला झालं नाही." 

थोपटेंनी भोरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. थोपटेंचा हा निर्णय मान्य असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. 

येत्या 22 एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे भाजप थोपटेंना कोणती जबाबदारी देतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. अशातच आधी रवींद्र धंगेकर आणि आता संग्राम थोपटे अशा दोन मोठ्या चेहऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. 

 

ही बातमी वाचा: