पुणे : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे त्यांच्या विमान अपघातामागे काही घातपात आहे का याची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी केला. अपघाताच्या दिवशी ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले असा प्रश्नही त्यांनी केला. विमान अपघातात बॉडी जळाली, पण कागदपत्रं तशीच राहिली, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करणार आहोत असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी विमान अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाला. आता त्या विमान अपघातावरुन संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेने तसेच सीआयडीनेही सुरू केला आहे.

Ajit Pawar Baramati Plane Crash : ऐनवेळी पायलट का बदलले?

अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, "आज पाच दिवस झाले, आमचा मेंदू बधीर झाला आहे. अजित पवार सकाळी 8 वाजता ज्या विमानाने येणार होते, त्याचे पायलट आणि को पायलट दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले आणि ऐनवेळी बदलले गेले. ते का करण्यात आलं? विमान खाली घेण्याची सूचना कुणी केली? आधी सहा माणसं या विमानात असल्याचं सांगितलं गेलं. मृत्यू पाच जणांचा झाला. मग सहावा माणूस कुठे गेला?"

Rupali Patil On Ajit Pawar : कागदपत्रं तशीच राहिली

रुपाली पाटील म्हणाल्या की, "लँडिंगच्यावेळी अडचणी असताना ते विमान खाली घेण्याची सूचना कुणी दिली? अडचण असेल तर ते विमान पुणे, सोलापूर किंवा इतर ठिकाणी उतरवायला हवं होतं. मात्र तसं न करता बारामतीमध्येच का उतरवलं?"

विमान अपघातात सगळ्या बॉडी जळाल्या, पण कागदपत्रं तशीच राहिली. त्यामुळे हा अपघात आहे की त्यामागे काही कटकारस्थान आहे याची चौकशी झालीच पाहिजे. आपण हा अपघात असल्याचं म्हणू आणि दुसरीकडे ज्याने हे कटकारस्थान केलं आहे तो मोकाट सुटायला नको असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. 

अजितदादांचा अपघात ही संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात? हा प्रश्न फक्त रुपाली पाटील ठोंबरेंचा नाही, प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीचा आहे. त्यामुळे याची चौकशी करावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली.

ही बातमी वाचा :